ठाकरे बंधु एकत्र येणार का याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. अशातच पवार कुटुंब ही एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतीच शरद पवार आणि अजित पवार यांची एका बैठकी निमित्त एकमेकांची भेट झाली. दोघांनी चर्चा ही केली, त्यानंतर या हे दोघे एकत्र येणार अशा बातम्या बाहेर आल्या. पण या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टिका केली. या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस जर एक होणार असेल तर त्यात शकुनी मामा सारखा मिठाचा खडा संजय राऊत यांनी टाकू नये असे मिटकरी म्हणाले. पवार कुटुंबात वितुष्ट निर्माण करु नये असा सल्लाही ते द्यायला विसरले नाहीत. ठाकरे किंवा पवार कुटुंब जर एकत्र येत असेल तर तुमच्या पोटात का पोटशुळ होत आहे असा प्रश्न ही त्यांनी राऊत यांना केला आहे. शरद पवार हे अनेक संस्थांचे अध्यक्ष आहेत. तर अजित पवार हे त्या संस्थांचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या भेट ह्या होतच असतात. त्यात नवीन काही नाही. महाविकास आघाडीचे काम करताना जेवढा वेळ संजय राऊत यांनी घालवला, तेवढा पवार साहेबांसोबत प्रशिक्षण घेतले असते, तर संजय राऊत यांना राजकीय शिष्टाचार आणि सुसंस्कृत पणा काय असतो ते लक्षात आले असते, असं ही मिटकरी म्हणाले.
जर पवार कुटुंब किंवा ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर त्याचे स्वागत केले पाहीजे असं ही ते म्हणाले. शिवाय ठाकरे कुटुंब एकत्र येवू नये यासाठी याच राऊत यांनी प्रयत्न केले असा आरोप ही मिटकरी यांनी यावेळी केला. त्या आधी संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर टिका केली होती. अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आलेलेच आहेत. आम्हाला आतापर्यंत कधी कोणाला एकत्र पहिले का? म्हणजे एसंशि गटाच्या कुणाला आम्ही भेटलो बोललो असं कुणी पाहिलं का? आम्ही त्यांना भेटणारच नाही. असं राऊत म्हणाले होते. शिवाय आमच्याकडे वसंतदादा संस्था नाही. आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही. त्यामुळे बंद खोलीमध्ये आम्ही बसलो नाही, असा चिमटाही राऊत यांनी काढला होता.
ट्रेंडिंग बातमी - Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार असं का बोलले?
दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली आहे. राज यांनी जी साद घातली त्याला उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिसाद दिला. त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र येतील असं बोललं जात होतं. पण दोन्ही पक्षातल्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. तर काहींनी हिच ती वेळ असल्याचं म्हटलं आहे. राऊत यांनीही ठाकरे बंधु एकत्र आले पाहीजे असं म्हटलं आहे. त्यात पवारांची झालेली भेट मात्र त्यांना खटकली आहे. त्यामुळेच मिटकरी यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.