सागर कुलकर्णी
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Assembly Budget Session 2025) सोमवारपासून म्हणजेच 3 मार्चपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resigns) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच जाहीर केले होते. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आले होते, मात्र धनंजय मुंडे यांनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला असल्याचे म्हटले होते.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून मागणी केली जात होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, विरोधी पक्षातील नेते यांनी वारंवार मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र त्यांचा राजीनामा मागायचा कोणी असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे निर्माण झाला होता. या दोघांमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून बरीच चर्चा झाली होती. या चर्चेनंतर दोघांनीही धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. स्वत: मुख्यमंत्र्यांनीही त्यांना राजीनामा द्या असे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. पडद्यामागे काय घडले ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या भूमिकेचे होते. त्यांनी सदर प्रकरणात कडक आणि ठोस भूमिका घेतली होती. धनंजय मुंडे हे काही केल्या राजीनामा देत नाही हे पाहून मुख्यमंत्री संतापले होते. सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो जगासमोर आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. 'तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल.' असे मुख्यमंत्री फडणवीसांनी बजावले होते. यानंतर चक्रे वेगाने फिरली आणि धनंजय मुंडे यांनी नमते घेत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. त्यांचा राजीनामा मिळताच तो तातडीने स्वीकारण्यात आला.