विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मोर्च बांधणी सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. नुकतेच भाजपच्या समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देतील. यापार्श्वभूमिवर पवार कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हा प्रश्नच मार्गी लागला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? चेहरा का घोषित केला जात नाही असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. कुठे घोडं अडलं आहे असंही त्यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुठेही घोडं अडलेलं नाही. सध्या मुख्यमंत्रिपदाबाबत विचार करण्याची गरज नाही. मविआमध्ये मुख्यमंत्रिपदाचा विषय नाही. सध्या कशाचाच काही पत्ता नाही. मुख्यमंत्री कोण असावा हे संख्याबळावर ठरेल. संख्याबळ आल्यानंतर त्याचा निर्णय घेवू असे शरद पवारांनी स्पष्ट केले. सध्या मविआला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. त्यामुळे स्थिर सरकार देण्याता आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले, संख्याबळ आल्यानंतर नेतृत्व कुणी करायचे याचा निर्णय होईल असे पवारांनी स्पष्ट केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?
याबाबत बोलताना त्यांनी 1977 चे उदाहरणही दिले. आणीबाणीनंतर देशात निवडणूका झाल्या. या निवडणुकांत जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोणताही चेहरा निवडणुकीत नव्हता. निवडणुकीनंतर मुरारजी देसाई यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आले. तो पर्यंत त्यांचे नाव कुठेही नव्हते. तो निर्णय निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर घेण्यात आला होता याची आठवण पवारांनी यावेळी करून दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा या मागणीला केराची टोपलीच दाखवली आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. याबाबत संजय राऊत अनेक वेळा बोलले आहेत. ठाकरेंनाही आपली इच्छा लपवता आलेली नाही. तर काँग्रेसकडूनही नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र शरद पवारांनी जे काही असेल ते निवडणुकीनंतर होईल हे स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world