मराठ्यांना ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या भेटीचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या मतांसोबत दलित आणि मुस्लिम समाजाची मतेही आपल्याकडे आकर्षित करण्याचा जरांगे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच त्यांनी गुरुवारी (31 ऑक्टोबर 2024) कट्टर विचारांसाठी ओळखले जाणारे मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीत जरांगे यांचं मुख्य लक्ष्य भारतीय जनता पार्टी आहे. जरांगे आणि भाजपा नेत्यांंमधील वाद आता नवा नाही. त्यातच नोमानी यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्यानं जरांगे यांचं वर्णन आधुनिक मोहम्मद अली जीना असं केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपा नेते नितेश राणे यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये जरांगेची तुलना पाकिस्तानचे निर्माते आणि फाळणीचे व्हिलन मोहम्मद अली जीना यांच्याशी केलं आहे. 'काल पत्रकार परिषद पाहिली. मराठा आरक्षण कसे हे जरांगे सांगत नाहीत. त्यांच्याजवळ बसलेले मुस्लीम राष्ट्रभक्त नाहीत.
तालिबानांचे समर्थन करणारे मौलवी आहेत. हेच शिवरायांचे विचार आहेत का? असा प्रश्न राणे यांनी जरांगे यांना विचारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाकिस्ताबाबतचे विचार आनंदराज आंबेडकरांना माहिती आहेत का? असा प्रश्नही राणे यांनी विचारला.
( नक्की वाचा : जरांगेंची गांधी-आंबेडकर-मौलाना आझादांशी तुलना करणारे सज्जाद नोमानी आहेत तरी कोण ? )
कोण आहेत सज्जाद नोमानी?
सज्जाद नोमानी हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. ते इस्लामसंदर्भात भाषणेही देत असतात. अनेकदा नोमानी हे आपली राजकीय भूमिका ठळकपणे मांडतात. नोमानी यांनी रामायणासंदर्भात बोलत असताना बुरख्याचे महत्त्व सांगताना रामायणाचा संदर्भ सांगत ते पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे बराच वाद झाला होता. नोमानी यांनी म्हटले होते की भारतामध्ये मुलींना हिजाब घालण्यापासून रोखले जाते. संपूर्ण जगाला हिजाब घालणे हे भारतानेच शिकवले असल्याचे त्यांचा दावा होता.
लक्ष्मण हे सीतामातेसोबत 14 वर्ष वनवासात होते, मात्र तरीही ते सीतेचा चेहरा पाहू शकले नाही, कारण सीता ही पडद्याआड असायची आणि ती कायम चेहरा झाकून ठेवायची, असा अजब दावा देखील नोमानी यांनी रामायणाचा दाखला देत केला होता.