लोकसभा निवडणूक झाली आहे. आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. त्यात आता ओबीसी नेते प्राध्यपक लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवार यांना ओबीसीचे अंतःकरण कळले असते तर पवार चारवेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असे वक्तव्य त्यांनी केले आहे. हाके हे नांदेड दौऱ्यावर असताना बोलत होते. शरद पवारांची पंतप्रधान होण्याची महत्वकांक्षा कधीही लपलेली नाही. पण त्यांना पंतप्रधान होता आले नाही हेही तितकेच खरं आहे. त्यामुळे पवारांच्या दुखत्या नसेवरच हाके यांनी बोट ठेवलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशात लढायचे सोडून पवार अठरा पगड जातीच्या आरक्षणात का घुसताय असा सवाल हाके त्यांनी यानिमित्ताने केला आहे. सात आठ महिने झाले तुम्ही ओबीसींच्या आरक्षणावर ब्र सुद्धा काढला नाही. लोकसभा निवडणुकीत तुम्ही पोळी भाजून घेतली. जर ओबीसीच्या व्यक्तीला निवडणुकीत उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर याचे आरक्षण तुम्ही काढून घेणार का असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. शिवाय पवार ओबीसीं बाबत काहीच बोलत नाहीत यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जो पक्ष ओबीसींचे सर्वात जास्त उमेदवार देणार त्यांना निवडून आणू असे हाके म्हणाले. नाही तर आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जो पक्ष ओबीसींचे सर्वात जास्त उमेदवार देणार त्यांनाच निवडून आणणार असेही हाके यांनी स्पष्ट केले आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही पक्षाने ओबीसीचे जास्त उमेदवार दिले नाही तर ओबीसीचे उमेदवार उभे करणार आणि ओबीसींच्या हक्काची भाषा करणारे उमेदवार विधानसभेत पाठवणार असेही हाके म्हणाले.
नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!
अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघात आयोजित ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात हाके यांनी चव्हाण यांच्यावरही तोफ डागली. अशोक चव्हाण चारवेळा जरांगे यांच्याकडे गेले. पण ओबीसीच्या उपोषणकर्त्याना भेटायला गेले नाहीत. शिवाय मनोज जरांगे पाटील अजिबात निवडणुका लढणार नाहीत. लोकसभे प्रमाणे कुणाला तरी पाठींबा देतील. असेही हाके यांनी सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसांचा स्टँड काय असेल हेच हाके यांनी स्पष्ट केले आहे.