आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वाद हे समिकरणच झाले आहेत. तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टिका केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. महायुतीत त्यानंतर खटके उडत होते. हे प्रकरण गरम असतानाच सावंत यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. आता हे विधान त्यांनी दुसरे तिसरे कोणाला नाही तर थेट शेतकऱ्यालाच केले आहे. त्यांनी जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्याची औकात काढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तानाजी सावंत हे टिकाकारांचे लक्ष्य झाले आहेत. विरोधकांनी ही सावंत यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुका या जवळ आल्या आहेत. त्यामुळे आमदार मंत्री आपल्या मतदार संघात गाव बैठका घेत आहेत. गाठीभेटींचे सत्र सध्या सुरू आहे. धाराशीव जिल्ह्यातील भूम परांडा या विधानसभा मतदार संघातही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते वाशी तालुक्यातील डोंगरवाडी या गावात आले होते. इथं त्यांनी स्थानिक शेतकऱ्यां बरोबर संवाद साधला.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला
संवाद सुरू असताना एका शेतकऱ्याने सावंत यांना पाणी पुरवठ्या बाबत प्रश्न विचारला.शेतकऱ्याने प्रश्न विचारणे तानाजी सावंत यांना आवडले नाही. त्यांचा संताप अनावर झाला. ते रागावले. ते त्या शेतकऱ्यावर चिडले. तानाजी सावंत यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, 'सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं, आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही.
शेतकऱ्याने विचारलेला प्रश्न तानाजी सावंत यांना आवडला नाहीच. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ते आवडले नाही. आधी तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याचा अपमान केला. ते कमी होतं की काय त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या शेतकऱ्याची गचांडी धरून त्याला बाहेरचा रस्ताही दाखवला. त्यामुळे गावातलं वातावरण तापलं होतं. या घटने आधीच तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी बरोबर जरी मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर महायुतीत शाब्दीक खटके उडाले होते. त्यानंतर आता सावंत यांनी शेतकऱ्याची औकातच काढली आहे. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world