त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी
Pankaja Munde Latur News : लातूर जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार न घातल्याने आंबेडकर प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंकजा मुंडे काल लातूर दौऱ्यावर होत्या.किंगाव येथे सभा आटोपून त्या जानवळ येथे दुसऱ्या सभेसाठी रवाना झाल्या. त्यानंतर मुंडे जानवळ येथे पोहोचल्या. परंतु, घाईगडबडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा औपचारिक कार्यक्रम राहून गेला. ही बाब लक्षात येताच परिसरात उपस्थित असलेल्या आंबेडकर प्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आणि वातावरण तणावपूर्ण झाले.
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?
सभा संपल्यानंतर पंकजा मुंडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तोपर्यंत आंबेडकर प्रेमी आक्रमक झाले होते. “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला.काही काळ परिस्थिती तणावपूर्ण राहिली पण उपस्थितांनी आपला विरोध कायम ठेवला. त्यामुळे पंकजा मुंडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार न घालताच तेथून परतावे लागले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर विरोधकांकडून टीकेची झोडही उठवण्यात आली आहे. आता या प्रकरणाचे लातूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीवर नेमके कसे पडसाद उमटतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा >> ममता बॅनर्जींनी वकिली कोट घातला, सरन्यायाधीशांसमोर हात जोडले अन् म्हणाल्या..
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसणार?
12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी येत्या 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्वच पक्षांकडून राज्यभरात सभांचा धडाका उठवण्यात आला आहे. भाजपच्या वतीने पंकजा मुंडेही प्रचाराचा नारळ फोडताना दिसत आहेत. मतदानाला फक्त 3 दिवस उरले असतानाच सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पंरतु, गिरीश महाजनानंतर पंकजा मुंडे वादात सापडल्याने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world