
भाजपच्या माजी खासदार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटाचा आरोप झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या हिंदू संत समेलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी 30 मार्च रोजी मालेगावमध्ये हे संत संमेलन होणार होते. परवानगी नाकारल्याने हे संमेलन आता वादात सापडले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत पोलीसांनी संमेलनास परवानगी नाकारली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साध्वी प्रज्ञासिंह यांना या संमेलनात हिंदूवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार होते. साध्वींनी संमेलनाचे निमंत्रण स्विकारल्याचा दावा आयोजकांनी केला होता. संमेलनासाठी फेब्रुवारीमध्ये आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने पीडितांच्या वकिलांनी साध्वीच्या उपस्थिती विषयी विशेष एनआयए न्यायालयात हरकत घेतली होती. साध्वी मालेगाव 2008 च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहेत.
हा बॉम्बस्फोट रमजान महिन्यात घडविण्यात आला होता. सदर संमेलन रमजान पर्वात होत असल्याने साध्वीला कुठल्याही परिस्थितीत शहरात घुसू देणार नाही असा इशारा समाजवादीतर्फे देण्यात आला होता. तर साध्वीला रोखून दाखवा असे प्रत्युत्तर हिंदुत्ववादी संघटनांनी समाजवादी पक्षाला दिलं होतं. नागपूर दंगल व आगामी सण, उत्सव पहाता पोलीसांनी संमेलनास परवानगी नाकारली आहे.
परवानगी नाकारल्याने हिंदुत्ववादी संघटना आयोजकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाय या हिंदू संत संमेलनाला परवानगी मिळावी म्हणून रिट पीटिशन ही दाखल केली आहे. शिवाय कुठल्याही परिस्थितीत संमेलन होणारचं अशी भूमीका आयोजकांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमीकेमुळे मालेगावमधील वातावरण मात्र तापलं आहे. अशा स्थितीत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या समेलनाचे भवितव्य आता कोर्टाच्या हातात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world