जाहिरात

Malegaon News :मालेगावचा महापौर कोण? बहुमतासाठी तिघांची गरज; 'इस्लामचा' सत्तेचा घरोबा नेमका कोणासोबत?

सत्तेसाठी 43 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी इस्लाम पार्टीने इतर पक्षांना आवाहन केलं होतं. यानुसार विरोधी एमआयएमसह काँग्रेस पक्षाने हात पुढे केल्याने वेगळाच तिढा निर्माण झाला आहे.

Malegaon News :मालेगावचा महापौर कोण? बहुमतासाठी तिघांची गरज; 'इस्लामचा' सत्तेचा घरोबा नेमका कोणासोबत?

Malegaon Municipal Corporation :  मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने 40 जागा मिळवित अव्वल स्थान मिळविले आहे. मात्र सत्तेसाठी 43 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांनी इतर पक्षांना आवाहन केलं होतं. यानुसार विरोधी एमआयएमसह काँग्रेस पक्षाने हात पुढे केल्याने वेगळाच तिढा निर्माण झाला आहे. त्यात शिवसेनाही इस्लामबरोबर येण्याची शक्यता असल्याने इस्लामचा सत्तेचा घरोबा नेमका कोणासोबत होणार याचीच चर्चा आहे. 

मुस्लिमबहुल मालेगावात पूर्व-पश्चिम अशी सरळ विभागणी झाली आहे. एकूण 84 पैकी 64 जागा या पूर्व म्हणजे मुस्लीम बहुल भागात तर हिंदू बहुल पश्चिम भागात अवघ्या 20 जागा आहे. पूर्वमध्ये आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखालील  एमआयएम आणि इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख पारंपरिक राजकीय विरोधक आहे. तर पश्चिम प्रभागात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपमध्ये सरळ लढत झाली. महापालिकेत आसिफ शेख यांनी समाजवादी पार्टीला सोबत घेत सेक्युलर फ्रंटची स्थापना करीत 40 जागांवर मिळविल्या आणि सत्तेच्या जवळ पोहचले. त्या खालोखाल एमआयएमने 21, शिवसेना 18, काँग्रेस 3 आणि  भाजपने 02 जागेवर विजय मिळविला आहे. सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या इस्लाम पक्षाचे प्रमुख माजी आ.आसिफ शेख यांनी इतर पक्षांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

सेक्यूलर फ्रंट - ४०
एमआयएम - २१
शिवसेना - १८
काँग्रेस - ३
भाजप - २

Nashik Mayor : नाशिकचा महापौर कोण होणार? भाजपमध्ये मोठी स्पर्धा; थेट मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग सुरू

नक्की वाचा - Nashik Mayor : नाशिकचा महापौर कोण होणार? भाजपमध्ये मोठी स्पर्धा; थेट मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग सुरू

इस्लाम पार्टीकडूम एमआयएमच्या माजी आमदार-पदाधिकाऱ्यांची भेट

इस्लाम पक्ष सर्वात मोठा असला तरी त्यांना सत्तेसाठी 3 नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेसने त्यांना यापूर्वीच पाठिंबा दिल्याने त्यांचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर एमआयएमने देखील शहराच्या विकासासाठी  इस्लामला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून एक प्रकारे इस्लाम पार्टीला कात्रीत पकडले आहे. त्याला कारणही तसंच आहे. सत्तेसाठी इस्लाम आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच एमआयएमने त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून इस्लामची अडचण केली. मात्र इस्लामने एक पाऊल पुढे टाकत थेट एमआयएमचे माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन बिनशर्त पाठिंबा देण्याची मागणी केली.

इस्लाम पार्टी कोणाला जवळ करणार? 

इस्लामकडून बिनशर्त पाठिंबा देण्याचा प्रस्ताव येताच एमआयएम सावध पवित्रा घेत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगत ते भिजत घोंगडं ठेवलं आहे. दुसरीकडे पश्चिम प्रभागात 24 पैकी 18 जागा जिंकत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपला करिष्मा कायम ठेवला आहे. परंतु सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांना इस्लाम किंवा एमआयएमशी हात मिळवणी करावी लागणार आहे. मात्र शिवसेनेची विचारधारा आणि हिंदुत्व या मुद्द्यावर त्यांच्यासमोर मोठे धर्म संकट उभे ठाकले आहे. त्यातच इस्लामचे नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच होते. 2017 मध्ये काँग्रेस आणि शिवसेनेनी एकत्र सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे त्यांना इस्लाम पार्टी अधिक जवळची वाटते. असे असले तरी मंत्री भुसे यांनी वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू टोलवत सावध पवित्रा घेतला आहे.

मालेगाव  महापालिकेच्या सत्तेच्या या सारीपाटावर कोण कोणाची अडचण करतेय तर कोणी राजकीय दबाव निर्माण करतेय तर कोणापुढे धर्मसंकट उभे राहिले आहे. असे असले तर इस्लाम पार्टी त्यांच्या मित्र पक्ष समाजवादी पार्टी तसेच काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करणार यात वाद नाही. मात्र त्यांच्यासोबत शिवसेना असेल की एमआयएम हे लवकरच समजेल..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com