जाहिरात

Chhagan Bhujbal: नाराज भुजबळ राष्ट्रवादीला 'जय महाराष्ट्र' करणार? समर्थकांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

Chhagan Bhujbal: नाराज भुजबळ राष्ट्रवादीला 'जय महाराष्ट्र' करणार? समर्थकांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ सध्या चांगलेच नाराज आहेत.
मुंबई:

राहुल वाघ, प्रतिनिधी

Chhagan Bhujbal: महाराष्ट्राच्या राजकारणात  पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये अचानक एका बॅनरमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता कोणता मोठा निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज असून, त्यांच्या समर्थकांनी थेट फलकबाजी करत त्यांना पक्ष सोडण्याचा किंवा वेगळा मार्ग निवडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

समर्थकांचे ते पोस्टर आणि थेट इशारा

नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी लावलेले फलक सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. या फलकांवर 'साहेब हीच वेळ योग्य निर्णय घेण्याची' असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या फलकबाजीतून भुजबळ समर्थकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. भुजबळ यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर असताना अचानक त्यांना डावलण्यात आल्याने समर्थकांनी आता भुजबळांनाच आरपारची लढाई लढण्याचे आवाहन या पोस्टर्सच्या माध्यमातून केले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News : मलंगगड मुक्तीचा सर्वात मोठा आवाज; 'या' एका निर्णयाने सुटणार वर्षानुवर्षांचा प्रलंबित प्रश्न! )

पडद्यामागे नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ स्वतः इच्छुक होते. मात्र, राज्यसभेवर जात असताना त्यांनी पक्षासमोर आणि महायुतीसमोर एक मोठी अट ठेवली होती. जर ते राज्यसभेवर गेले, तर राज्यातील त्यांचे मंत्रीपद त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना देण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. 

सूत्रांच्या माहितीनुसार, भुजबळ यांच्या या अटीला दिल्लीतील भाजप नेतृत्वाने रेड सिग्नल दिला. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून हा निर्णय अडकल्याचे बोलले जात आहे. अखेर छगन भुजबळ यांना मोठा धक्का देत पक्षाने थेट राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली, ज्यामुळे भुजबळांची नाराजी उघड झाली आहे.

या संपूर्ण घडामोडींवर स्वतः छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया देताना मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, मला राज्यसभा आणि लोकसभेला जाण्याची इच्छा होती. यापूर्वी 4 ते 5 वेळा अशी संधी आली, पण दुर्दैवाने ती हुकली. यावेळी तरी संधी मिळेल अशी आशा होती. पक्षात इतरांना जो न्याय लावला, तोच न्याय मलाही लावावा अशी माझी विनंती होती. मकरंद पाटील मंत्री आहेत आणि त्यांचे भाऊ खासदार आहेत. 

( नक्की वाचा : Modi cabinet: मोदी सरकारमध्ये लवकरच मोठे फेरबदल? 'या' कारणांमुळे अनेक बड्या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात! )

सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार आहेत तर त्यांचे पुत्र पार्थ पवार किंवा संबंधित नेते राजकारणात सक्रिय आहेत. तटकरे स्वतः खासदार आहेत आणि त्यांचे पुत्र आमदार आहेत. मग माझ्याच बाबतीत हा नियम का बदलला, असा सवाल त्यांनी केला. हा आपल्यावर अन्याय असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले आहे.

'मी बुद्धिबळाचा नाही, कबड्डीचा खेळाडू'

आपल्या पुढील भूमिकेविषयी बोलताना छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, राजकारणात असे चढउतार चालायचेच. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा संधी मिळेल. पण मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही. मला बुद्धिबळ खेळता येत नाही आणि ते जमतही नाही. त्यांच्या या 'कबड्डी'च्या विधानामुळे ते आता समोरच्याला थेट आस्मान दाखवण्यासाठी मैदानात उतरणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com