- एकनाथ शिंदे यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी साडेतीन वर्षे आधीच तयारी सुरू केली आहे
- भगीरथ भालके आणि अनिल सावंत या दोन्ही नेत्यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला जाणार आहे
- पंढरपुर मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार असून महायुतीत ही जागा भाजपकडे आहे
संकेत कुलकर्णी
राज्यातील विधानसभा निवडणुकीला साडेतीन वर्षे अद्याप शिल्लक आहेत. असं असतानाच राजकीय स्पर्धा आतापासूनच सुरू झाली आहे. विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. म्हणूनच पंढरपुरात भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांना पक्ष प्रवेश देण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच टार्गेट विधानसभा हे लक्ष्य ठेवले आहे. पंढरपुरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असलेले भगीरथ भालके, अनिल सावंत यांनी थेट विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. 2029 सालचा पंढरपूरचा आमदार शिंदेंच्या विचाराचा होईल अशी घोषणा भालके यांनी केली आहे. त्यामुळे पंढरपुरात राजकीय चुरस आत्तापासूनच सुरू झाली.
पंढरपुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. महायुतीत ही जागा भाजपकडे आहे. अशा परिस्थितीत मागील विधानसभा निवडणुकीत 1 लाख 15 हजार इतकी मते घेणारे भगीरथ भालके , आणि मागील निवडणुकीतच तीन नंबरची मते घेणारे अनिल सावंत हे दोघेही एकत्र येऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहे. या दोघांच्या मतांची गोळा बेरीज व शिवसेनेच्या पारंपारिक मतांची आकडेवारी पाहिली तर निश्चितच विद्यमान भाजप आमदारांच्या विजयी मतापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सहाजिकच एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात थेट विधानसभेची तयारी या दोन्ही नेत्यांना जवळ करून सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील राजकीय गणितामध्ये भाजपला सक्षम पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुढे येत आहे अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे. पंढरपुरात भालके आणि सावंत गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातूनच महाराष्ट्रातील विधानसभेची प्रत्येक मतदार संघात शिंदे यांनी स्वतंत्र तयारी केल्याचे दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून पंढरपुरात भालके आणि सावंत या दोन मोठ्या नेत्यांना प्रवेश देत विधानसभेचे बेरजेचे राजकारण एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्याचे दिसून येते.
एकमेकांच्या नेत्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही असा अलिखीत करार शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये झाला आहे. मात्र आता मतदार संघातच बड्या नेत्यांना घेण्याचा भर शिंदेंच्या शिवसेनेनं दिला आहे. 2029 ची विधानसभा निवडणूक ही महायुतीत लढणार की स्वतंत्र लढणार हे महायुतीतल्या तिन्ही पक्षांना माहित नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मात्र आतापासूनच तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. शिंदे हे सध्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी ते समाधानी नाहीत असचं बोललं जात आहे. मुख्यमंत्रीपद त्यांना अजून ही खुणावत आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक मतदार संघात तयारी सुरू केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world