Pune News : पुणे महापालिकेला कधी मिळणार महापौर? 'या' तारखेला 165 नगरसेवकांची विशेष बैठक, कोण कोण आहे शर्यतीत?

 पुणे महानगर पालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता तीन आठवड्यांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेला अखेर महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. वाचा सविस्तर माहिती..

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Municipal Corporation Mayor Update
पुणे:

Pune Municipal Corporation Mayor Update : पुणे महानगर पालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता तीन आठवड्यांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेला अखेर महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. 41 प्रभागांमधून निवडून आलेल्या 165 नगरसेवकांची विशेष सभेची बैठक 6 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. याच बैठकीत या दोन सर्वोच्च पदांसाठी मतदान होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान,निवडणूक प्रक्रियेविषयीचा सविस्तर कार्यक्रम पुढील काही दिवसांत जाहीर केला जाणार आहे. महापौर पदासाठीची निवडणूक घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता आणि त्याला मंजुरी मिळाल्याचंही समजते. 

पुण्याचे महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.राज्याच्या नगरविकास विभागाने घेतलेल्या आरक्षण सोडतीद्वारे या राखीव जागेचा निर्णय घेण्यात आला. महापौर निवडणूक निश्चित होताच नवीन महापौर भाजपचाच असणार हे स्पष्ट आहे.कारण 165 पैकी 119 नगरसेवक भाजपचे असल्याने त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महापौरपदासाठीचा उमेदवार पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.तसच महापौर निवडणुकीपूर्वी सभागृह नेत्याचीही निवड करण्यात येणार आहे.महापौरपदाच्या स्पर्धेत असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नगरसेवकांमध्ये वर्षा तपकीर, स्मिता वस्ते, मंजुषा खर्डेकर आणि मंजुषा नागपूरे यांचा समावेश आहे.

नक्की वाचा >> Kalyan News : शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराने मृत्यू, पोलिसांच्या एका फोनमुळे..

2017 मध्ये पक्षाने 97 जागा जिंकल्या, यंदाच्या निवडणुकीत आकडा वाढला 

2017 मध्ये पक्षाने 97 जागा जिंकल्या होत्या.यंदाच्या निवडणुकीत हा आकडा वाढून 119 वर पोहोचला आहे. महापौरसह विविध पदांसाठी अनेक इच्छुक असले तरी सर्व नावांवर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी एकमताने घेणार आहेत. शहरातील विविध भागांना प्रतिनिधित्व मिळावे,याचा विचार करूनच पक्ष विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करेल,असंही म्हटलं जातंय. महापौरपद महिलांसाठी राखीव असल्यामुळे अनेक नगरसेवक इतर महत्त्वाच्या पदांसाठी लॉबिंग करत आहेत. यामध्ये स्थायी समिती, शहर सुधार समिती,इतर विविध समित्यांच्या अध्यक्षा व सदस्य पदांसह उपमहापौर पदाचा समावेश आहे,अशी भाजपच्या सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चंदेरे,निलेश निकम,माजी महापौर वैशाली बानकर तसेच वरिष्ठ नगरसेवक दत्ता बहिरत आणि रेखा टिंगरे यांची विविध पदांसाठी प्रमुख दावेदार म्हणून चर्चा आहे.

नक्की वाचा >> अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली

नवीन 165 नगरसेवकांपैकी वयोगटानुसार स्थिती

  • 54 नगरसेवक हे 41 ते 50 वयोगटातील आहेत.
  • 51 नगरसेवक 31 ते 40 वयोगटातील आहेत.

एकत्र पाहता, 31 ते 50 या ‘मिडल एज' गटातील नगरसेवकांची संख्या 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.गेल्या काही वर्षांत PMC हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या 22 क्षेत्रांमधून निवडून आलेल्या 40 नवीन नगरसेवकांमध्ये दोन माजी सरपंच,काही माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा समावेश आहे. यापैकी अनेकांनी महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच विजय मिळवला आहे.

Advertisement