अविनाश पवार, प्रतिनिधी
NCP Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत सुनेत्रा पवारांना पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी लोकभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी मोठं विधान केलं आहे. "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा होती. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच एकत्र येतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अतुल बेनके नेमकं काय म्हणाले?
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असल्याचा आनंद व्यक्त करत अतुल बेनके म्हणाले, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत आहेत.याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे.त्या सक्षम असून प्रशासन उत्तमप्रकारे सांभाळतील. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात,ही अजित पवार यांची इच्छा होती आणि याबाबत अजित पवार,खासदार अमोल कोल्हे आणि माझ्यासोबत चर्चाही झाली होती.सध्या राजकीय परिस्थिती काहीही असली तरी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील".
नक्की वाचा >> Explainer : घाईगडबडीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय भीती होती?
बॅनरवर अनेकदा शरद पवारांचे फोटो लावले
महत्त्वाचे म्हणजे,अतुल बेनके यांनी यापूर्वीही विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात,अशी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. त्यांच्या बॅनरवर अनेकदा शरद पवार यांचे फोटो लावण्यात आले होते.त्यामुळे राजकीय वादही निर्माण झाले होते. पण या टीका-टीप्पणीकडे दुर्लक्ष करत अतुल बेनके त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले होते. अतुल बेनके यांचे वडील वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते.त्यामुळे बेनके कुटुंबीयांचे पवार कुटुंबाशी घनिष्ठ संबंध राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अतुल बेनके यांनी वारंवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या चर्चांना वेग आला आहे.