सूरज कसबे
पुणे शहरातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात नवा आणि गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील जुहू येथील 'बॉम्बे फ्लाइंग स्कूल' ( Bombay Flying School ) या संस्थेच्या देयकामध्ये मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोठी सूट मिळवून दिल्याचे धंगेकर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या नव्या आरोपा मुळे मोहोळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीत मस्ती नको अशी सुचना एकनाथ शिंदे यांनी केली असतानाही धंगेकर यांनी केलेला हा आरोप नक्की कोणता इशारा करत आहे याची चर्चा पुण्यात सुरू आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
रवींद्र धंगेकर यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर पोस्ट करून हा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे विशाल गोखले यांना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून देण्यात आले होते. जुहू फ्लाइंग क्लबचे सुमारे 200 कोटी रुपयांचे देय बाकी होते. मात्र, केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर करत मोहोळ यांनी ही रक्कम केवळ 2.30 कोटी रुपयांपर्यंत कमी करून घेतली, असा धंगेकर यांचा मुख्य आरोप आहे. या आरोपाची चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तूळात रंगली आहे.
197 कोटींच्या नुकसानीचा आरोप
धंगेकर यांनी थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर केल्यामुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. ज्या क्लबला हा फायदा मिळवून दिला, त्याच 'मुंबई फ्लाइंग क्लब'ने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.
'दलाली'चा थेट सवाल
यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची 'दलाली' विशाल गोखले यांच्यामार्फत मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे, असा थेट सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला असून, हा तपासाचा विषय असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः खुलासा करावा, अशी मागणी धंगेकर यांनी 'X' वरील आपल्या पोस्टमध्ये केली आहे.
जैन बोर्डिंग प्रकरणानंतर नवा 'बॉम्ब'
यापूर्वी, रवींद्र धंगेकर यांनी पुणे येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या वादानंतर आता मुंबईतील जुहू फ्लाइंग क्लबच्या देयकासंबंधीचा हा नवीन आरोप धंगेकर यांनी करून महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद आणखी तीव्र केला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही…..
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 26, 2025
केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका… pic.twitter.com/UFckuebg3n
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world