केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी त्यांना जेवणासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी तटकरे यांनी मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांनाही जेवणासाठी बोलावलं होतं. पण गोगावले यांनी जेवणास जाणे टाळले होते. तटकरे आणि गोगावले यांच्यातले राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे. त्या पार्श्वभूमीवर गोगावले जेवणासाठी का गेले नाहीत त्याचं कारण आता समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुनिल तटकरे यांनी अमित शाह यांच्या सोबत शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनाही जेवणाचे आमंत्रण दिले होते. पण मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य शिवसेनेचे आमदार, मंत्री सुतारवाडीत तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणाला गेले नाहीत. त्यावर तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. याला तटकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यातील वादाची किनार आहे का याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. रायगडमध्ये तटकरे विरुद्ध शिवसेना असेच चित्र आहे.
या चर्चेनंतर आता भरत गोगावले यांनी त्याला उत्तर दिले आहे. अमित शाह रायगड दौऱ्यावर असताना रायगड किल्ल्यावरून ते हेलिकॉप्टरने तटकरे यांच्या घरी गेले होते. आम्ही रायगड उतरून कार ने जायाला 50 मिनिटे लागली असती. अमित शाह तेथे 40 मिनिटे आधीच पोहोचले होते. त्यामुळे आम्ही वेळेत पोहचू शकलो नसतो. असं कारण भरत गोगावले यांनी दिले आहे. तटकरे यांनी आम्हाला त्यांच्या घरी अमित शाह यांच्या सोबत जेवणाचे आमंत्रण दिले होते ते आम्ही मान्य करतो असं गोगावले म्हणाले. शिवाय तिथं जाता आलं नाही याचा दुसरा अर्थ काढू नका असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अमित शाह यांच्या राज्यातील दौऱ्या दरम्यान एकनाथ शिंदे हे नाराज होते. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे नाराज नाहीत, त्यांच्या रायगड दौऱ्यात आम्ही सोबत होतो. ते कुठेही नाराज असल्याचे जाणवले नाही. तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे असे गोगावले म्हणाले. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदा बाबत निर्णय घेण्यासाठी तातडीने मुंबईला बोलावले होते, ही बातमी चुकीची असल्याचं ही गोगावले यांनी स्पष्ट केलं.