Raj Thackeray and Uddhav Thackeray Share Stage: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात एक खास कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. यावेळी अमित ठाकरे आणि संजय राऊत यांचीही उपस्थिती होती. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर राज आणि उद्धव पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमात एकत्र आले होते. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाच, पण त्याच वेळी सध्याच्या राजकारणावर, विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले राज?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना पाठिंबा दिला. या विषयावर राज काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज राज्यात आणि विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही गलिच्छ राजकारण सुरू आहे, ते पाहून आपल्याला शिसारी आली आहे, असे राज यावेळी म्हणाले. बाळासाहेब आज हयात नाहीत हे एक प्रकारे बरंच झालं, कारण आजची ही परिस्थिती पाहून त्यांना खूप वेदना झाल्या असत्या, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Raj Thackeray : 'माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं.. ' थेट उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरेंनी मांडली वेदना, पाहा VIDEO )
बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते आणि ते कोणालाही पूर्णपणे समजले नाहीत, असे मत राज यांनी व्यक्त केले. बाळासाहेब हे केवळ एक राजकारणी किंवा हिंदुहृदयसम्राट नव्हते, तर ते एक थोर व्यंगचित्रकार होते.
राज ठाकरे यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सांगितले की, बाहेर जगात काहीही घडत असले तरी त्याचा परिणाम बाळासाहेबांच्या व्यंगचित्राच्या रेषेवर कधीही उमटला नाही. त्यांची एकाग्रता इतकी जबरदस्त होती की बाहेरील गोंधळाचा त्यांच्या कलेवर कोणताही परिणाम होत नसे. बाळासाहेब या विषयावर आपल्याला एक मोठे व्याख्यान द्यायला नक्कीच आवडेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना सोडतानाची वेदना
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या त्या जुन्या प्रसंगालाही उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, मी ज्या वेळी शिवसेना सोडली, त्या वेळच्या वेदना काही वेगळ्याच होत्या. माझ्यासाठी तो फक्त एक राजकीय पक्ष सोडण्याचा निर्णय नव्हता, तर ते माझे स्वतःचे घर सोडण्यासारखे होते. या घटनेला आता 20 वर्षांचा मोठा काळ लोटला आहे, असे राज म्हणाले.
गेल्या 20 वर्षात आपल्याला अनेक गोष्टी उमजल्या आहेत आणि त्या उद्धव ठाकरे यांनाही नक्कीच समजल्या असतील, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.