Raj Thackeray and Uddhav Thackeray Share Stage : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना का सोडली हे सांगितलं.
काय म्हणाले राज?
राज ठाकरे म्हणाले की, मी ज्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळच्या वेदना पूर्णपणे वेगळ्या होत्या. माझ्यासाठी तो केवळ एक राजकीय पक्ष सोडण्याचा निर्णय नव्हता, तर ते माझे स्वतःचे घर सोडण्यासारखे होते. या घटनेला आता 20 वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. या दोन दशकात काळ खूप पुढे निघून गेला आहे आणि अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे.
त्या काळातील संघर्षावर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, गेल्या 20 वर्षात मलाही अनेक गोष्टी उमजल्या आहेत आणि मला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांनाही अनेक गोष्टी समजल्या असतील. त्यामुळे आता त्या जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही, जे झाले ते आता सोडून दिले पाहिजे. राज ठाकरे यांनी अतिशय भावूक होऊन हे मत मांडले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Sadan Scam : 20 हजार पानांचे आरोपपत्र तरीही भुजबळ निर्दोष; ED ची केस नेमकी कुठे फसली? वाचा सविस्तर )
बाळासाहेब आज असते तर...
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण डोंबिवलीसह अनेक ठिकाणी सध्या जे राजकारण सुरू आहे, ते पाहून आपल्याला शिसारी आली आहे, असे ते म्हणाले. आज हे सर्व पाहायला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत, हीच सर्वात चांगली गोष्ट आहे असे मला वाटते.
कारण आजचे हे गलिच्छ राजकारण आणि हिंदुत्वाचा मांडलेला बाजार पाहून बाळासाहेबांना प्रचंड वेदना झाल्या असत्या, तो माणूस हे सर्व सहनच करू शकला नसता, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत शिंदेंना पाठिंबा का दिला? मनसे नेत्यांनी सांगितली A to Z कारणं )
हिंदू ही राजकीय शक्ती असल्याचे बाळासाहेबांनी सिद्ध केले
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी 1984-85 सालचा एक जुना प्रसंग सांगितला. दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील संवादाची त्यांनी आठवण करून दिली. बाळासाहेब म्हणाले होते की, मी या देशातील हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार ही एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उभी राहील. त्यावर प्रमोद महाजन यांनी ही गोष्ट शक्य नसल्याचे म्हटले होते. मात्र बाळासाहेबांनी ती गोष्ट करून दाखवली. या देशात हिंदू ही एक प्रबळ राजकीय शक्ती होऊ शकते, हे बाळासाहेबांनी जगाला सिद्ध करून दाखवले, ज्याची कल्पना त्यावेळी भारतीय जनता पक्षालाही नव्हती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world