Raj Thackeray: राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू शनिवारी (5 जुलै) रोजी एकाच व्यासपीठावर आले होते. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एका स्टेजवर आल्यानं त्यांच्यात युती होणार का? ही चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईत सर्वांनी मराठी भाषा बोलली पाहिजे यासाठीही मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठी भाषेसाठीचे आंदोलन सुरु असतानाच राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.
पक्षातील कुणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही, असं राज ठाकरेंनी बजावलंय. त्याचबरोबर स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकण्यासही राज यांनी मनाई केलीय.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज यांनी ट्विट करत याबाबतचा आदेश दिलाय. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे.' एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही. '
राज ठाकरे यांनी हा आदेश का दिलाय याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.