महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुडीपाडव्याला मनसेचा मेळावा आहे. त्या आधी ही दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. राज यांच्या विरोधात परळी वैजनाथ येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. शिवाय दोषारोपपत्र ही दाखल होते. ते आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी आणि न्या.संजय देशमुख यांनी हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण 2008 सालातील आहे. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर 2008 साली अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परळी-गंगाखेड या मार्गावर एस.टी.बस थांबवून दगडफेक झाली होती. या प्रकरणी राज ठाकरे आणि इतर आरोपीविरुध्द विविध कलमांखालील गुन्हे दाखल झाले होते.
ट्रेंडिंग बातमी - Sudhakar Pathare: तेलंगणात अपघाती निधन झालेले आयपीएस सुधाकर पठारे कोण?
त्यात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याबाबत परळी वैजनाथ येथील ग्रामीण पोलिसात याबाबतची एफआयआर ही दाखल करण्यात आली होती. संबंधित तपासी अधिकारी यांनी गुन्ह्याचा तपास करून राज ठाकरे व इतर आरोपी यांच्या विरोधात परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याला अॅड अरुण शेजवळ यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.
यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा, दोषारोपपत्रात नाही असा युक्तीवाद करण्यात आला होता. शिवाय ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी राज ठाकरे हे त्या ठिकाणी नव्हतेच असा युक्तीवादही राज यांच्या वकीलांनी यावेळी कोर्टात केला. त्यांचा हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला आहे. शिवाय राज ठाकरे यांना दिलासा देत त्यांच्यावरील दोषारोपपत्र रद्द केले आहे.