
सुनिल दवंगे
शिर्डी साईबाबा संस्थानचा सदस्य बनवतो असे सांगून राजस्थान मधील काँग्रेसच्या माजी कॅबिनेट मंत्र्याची फसवणूक करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्याकडून सहा हजार रुपये ही घेण्यात आले. हा धक्कादायक प्रकार शिर्डीत उघडकीस आला आहे. राजस्थानचे माजी मंत्री जोगिन्दर सिंह अवाना यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. साईबाबांच्या दर्शनादरम्यान ओळखीचा फायदा घेत ही फसवणूक झाल्याचे समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यस्थानचे काँग्रेस पक्षाचे माजी कॅबिनेट मंत्री जोगिंदर सिंह अवाना यांना साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा सदस्य करतो असे सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून सहा हजार रुपयांची रक्कम उकळण्यात आलीय. महत्वाच म्हणजे साईसंस्थानचे सदस्यत्वासाठी 51 हजार रुपये ऐवढी रक्कम भरावी लागते. राजस्थान राज्यातील नदबई-भरतपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी कॅबिनेट मंत्री जोगिंदर सिंह अवाना हे गेल्या 36 वर्षांपासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी सहपरिवार शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी ते आले होते.
त्यावेळी अमोल गुजराथी नावाचा इसमाने त्यांचे व्हीआयपी साई दर्शन करून दिले होते. साईंचे व्हीआयपी दर्शन झाल्याने भाविक अतिशय आनंदी झाले होते. यानंतर जोगिंदर आणि गुजराथी यांची मैत्री झाली. याच मैत्रीचा फायदा उचलत अमोल गुजराथी याने यापुढे ही असेच व्हीआयपी दर्शन तुम्हाला कायम मिळत राहील. तुम्हाला साईबाबा संस्थांचा सदस्य बनवतो असे सांगून ऑनलाइन सहा हजार रुपय मागवले.
यानंतर काही दिवसांनी अमोल गुजराथी या इसमाला संपर्क करून पैसे भरल्याची पावतीची मागणी केली. मात्र पैसे भरल्याची पावती देत नसल्याने व उडाउडीचे उत्तर देत असल्याने त्यांच्या लक्षात आले. आपली ही फसवणूक झालीय. साईभक्त व माजी कॅबिनेट मंत्री जोगिन्दर सिंह अवाना हे आज सहपरिवार शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता, आपली फसवणूक झाल्याचं त्यांनी साईसंस्थानच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी शिर्डी पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world