Raj Thackeray : पुढच्या तीन साडेतीन महिन्यात यांना जेवढ्या दंगली घडवता येतील, त्या घडवण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहे. जेम्स लेन प्रकरणापासून शरद पवारांनी हे राजकारण सुरू केले आहे.जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्षे आहे, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात आहे. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केली तेव्हापासून सुरू झालं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला. या दौऱ्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठवाड्यात दंगली घडवण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरक्षणावर भूमिका कायम
आरक्षणाबबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सोलापूरमधील पत्रकार परिषदेच्या नंतर जाणीवपूर्वक राज ठाकरे विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण केलं. आरक्षण हवं असेलच तर ते आर्थिक निकषावर हवं, अशी आमची 2006 पासून भूमिका आहे. महाराष्ट्रात इतक्या सुविधा आहेत की त्याला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
पवार, उद्धव यांच्यावर हल्लाबोल
माझ्या दौऱ्य़ाचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी काही संबंध नव्हता. या आंदोलनाच्या मागून राजकारण सुरु आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हे समजून घेतलं पाहिजे की त्यांना झालेले मतदान हे मोदींच्या विरोधातून झालेले मतदान आहे. त्यांच्या प्रेमाखातर झालेले हे मतदान नव्हतं.
शरद पवारांसारखा माणूस म्हणतो महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल, या लोकांनी मणिपूर होऊ नये यासाठी चिंता केली पाहीजे. तर हीच माणसे असे म्हणत आहे. यावरून त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुमच्या लक्षात येईल.
त्यांनी माझ्या नादाला लागू नये. माझं मोहोळ उठलं तर त्यांना एकही सभा घेता येणार नाही, असा इशारा राज यांनी यावेळी दिला.
'माझ्या दौऱ्यादरम्यान या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, उद्या माझे मोहोळ उठले तर यांना निवडणुकीला एकही सभाही घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. यांच्याकडे जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहे. त्यांनी माझ्या नादी लागू नये. समाजात तेढ निर्माण करून, विष कालवून यांना कसले राजकारण करायचे आहे?' असं राज म्हणाले.
( ट्रेंडिंग बातमी : Video - राज यांच्या गाडीवर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी 'सुपाऱ्या' फेकल्या, मनसैनिकांनी धडा शिकवण्याचा 'विडा' उचलला )
5 वर्ष शब्द का टाकला नाही?
'तुमचा राजकारणात राग देवेंद्र फडणवीसांना असेल राजकारणात त्या पद्धतीने बोला, समाजात का भांडणे लावत आहात ? मराठा समाजाचा 2004 आसपास पहिला मोर्चा निघाला होता. मोर्चा अडवला गेला तेव्हा व्यासपीठावर भाजपची लोकं होती, राष्ट्रवादी काँग्रेसची लोकं होती, काँग्रेसची होती, शिवसेनेची लोकं होती. सगळ्यांनी एकमुखाने सांगितले की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मग अडवले कोणी ? एकमत आहे तर मग तुम्हाला अडवलंय कोणी ?
गेली 10 वर्ष केंद्रात मोदी बहुमताने पंतप्रधान होते. पवारांनी मोदींकडे तेव्हा मराठा समाजासाठी आरक्षणासाठी शब्द का टाकला नाही. उद्धव ठाकरे पहिली 5 वर्ष भाजप सोबत नांदत होते ना , त्यांनी शब्द का टाकला नाही. जरांगे पाटील यांच्या मागून सुरू असलेले राजकारण हे मते मिळवण्यासाठी आहे.
माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील हे कळणार पण नाही. नंतर घरी गेल्यानंर पाठ-पोट आणि गाल पाहावे लागतील. जातीचे राजकारण पसरता कामा नये ही भूमिका शरद पवारांसारख्या बुजुर्ग नेत्याने घ्यायला हवी, त्याऐवजी तेच हातभार लावत आहेत. जातीमध्ये विद्वेष पसरवण्यापलिकडे यांचे राजकारण गेले नाही, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.