हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसणार, भाजपने फासे टाकले, बडा नेता गळाला

पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून जर कोणाची ओळख असेल तर ती राजीव पाटील यांची आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हेच राजीव पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
पालघर:

मनोज सातवी 

वसई विरारच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा म्हणून हितेंद्र ठाकूर यांना ओळखलं  जातं.  यांच्यानंतर पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून जर कोणाची ओळख असेल तर ती राजीव पाटील यांची आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हेच राजीव पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. ते कोणत्याही क्षणी भाजपात दाखल होतील अशी चर्चा आहे. राजीव पाटील हे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ आहे. ते 2009 मध्ये वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर पहिले महापौर झाले होते. त्यानंतर राजीव पाटील विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना अजूनही ती संधी मिळाली नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजीव पाटील यांच्या सोबत 50 पेक्षा जास्त माजी नगरसेवक आहेत. ते सर्व जण पाटील यांच्या बरोबर भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच, या अगोदर बहुजन विकास आघाडीच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री, पालघर जिल्हा परिषदेच्या विद्यमान समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर राजीव पाटील यांच्या रूपाने बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. राजीव पाटील याच्या भाजप प्रवेशाने भाजपला बळ मिळणार आहे. त्याचा फटका मात्र हितेंद्र ठाकूर यांना बसू शकतो.  

ट्रेंडिंग बातमी - नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे दोन ठराव, निवडणुकीच्या तोंडावर वाद चव्हाट्यावर

राजीव पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आठवडाभरपसून सुरू आहे. वसई विरार परिसरात ठीक ठिकाणी लागलेल्या बॅनर वर केवळ राजीव पाटील यांचाच फोटो झळकत आहे. तर दुसरीकडे वसई विरार शहरात बहुजन विकास आघाडी पक्षाच्या लागलेल्या बॅनर वरून राजीव पाटील यांचा फोटो वगळला आहे. विशेष म्हणजे राजीव पाटील यांच्या  कार्यकर्त्यांनी देखील राजीव पाटील आणि पंतप्रधान मोदींच्या फोटोंचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजीव पाटील हे लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हात बदल; निवडणूक आयोगाने 'ती' मागणी फेटाळली

वसई विरार पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांची मोठी ताकद आहे. पक्षाचे तीन आमदार याच भागातून निवडून आले आहेत. त्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीव पाटील यांनी ठाकूर यांची साथ सोडणे पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे. राजीव पाटील यांना मानणाराही मोठा वर्ग आहे. राजीव पाटील यांची आमदार होण्याची महत्वकांक्षा आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र आता ते कोणत्या मतदार संघातून मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.