देवा राखुंडे
उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी गंभीर विधान केले आहे. त्याला पार्श्वभूमी आहे पवारांच्या भावकीची. नुकताच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला अजित पवार उपस्थित होते. त्याच वेळी व्यासपीठावर जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार ही उपस्थित होती. यावेळी भावकीमुळेच रोहित तू आमदार झालास असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. हे वक्तव्य राम शिंदे यांच्या मनाला चटका लावून गेलं आहे. ते हे वक्तव्य करून मला सतत टॉर्चर करत आहेत असा थेट आरोपच राम शिंदे यांनी केला आहे. राम शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा विधानसभेला रोहित पवारांनी पराभव केला होता.
सांगलीत झालेल्या कार्यक्रमात रोहित पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी रोहित पवारांनी आधी अजित पवारांना डिवचंल. ते बोलताना म्हणाले, अजित दादा गावकीचा विचार करतात. मात्र, भावकीला ते विसरले आहेत. असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला होता. याला अजित पवारांनीही तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलं. ते ही त्याच व्यासपीठावरून. अजित पवार म्हणाले की, रोहित म्हणाला की दादांचे गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे लक्ष नाही.
नक्की वाचा - Kalyan News: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
पुढे अजित पवार म्हणाले की भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास, असा टोलाही त्यांनी रोहित पवार यांना लगावला. पण हा टोला रोहित यांच्या पेक्षा राम शिंदे यांच्याच जास्त जिव्हारी लागला. या आधीही राम शिंदे यांना अजित पवारांनी युतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादीची मदत झाली नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे रोहित पवारांचेच काम करत होते असा आरोप त्यांनी या आधी केला. त्यांच्या या वक्तव्यावर एक प्रकारे अजित पवारांनीच शिक्कामोहर्तब केले अशी चर्चा आहे.
अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तू आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं, यावरूनच भाजपचे नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं ही शिंदे म्हणाले. अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा पुन्हा करून शिळ्या कडीला उत का आणत आहेत ? अशी विचारणा ही या निमित्ताने राम शिंदे यांनी केली.