आठवलेंची विधानसभा निवडणुकीत मोठी मागणी, भाजप समोर मार्ग काढण्याचे आव्हान

महायुतीतल्या प्रमुख तीन पक्षात अजूनही जागा वाटपाबाबत एकमत झालेले नाही. कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही निश्चित नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची सध्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सुरू आहे. मात्र छोटे मित्रपक्ष अजूनही या जागा वाटपाच्या चर्चेचा भाग नाहीत. महायुतीतील छोट्या पक्षांनी आपल्यापरीने किती जागा पाहीजेत हे सांगितले आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही रिपब्लिकन  पक्षाला विधानसभेला जागा मिळाल्या पाहीजेत अशी मागणी केली आहे. शिवाय अन्य मागण्यांची यादीच भाजप नेतृत्वा समोर ठेवली आहे. विधानसभेला किती आणि कोणत्या जागा पाहीजे हे भाजप नेतृत्वाला सांगितल्या मुळे त्यातून मार्ग कसा काढायचा हे आव्हान आता पक्ष नेतृत्वा समोर आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत पत्र देवून रिपब्लिकन पक्षाला  विधानसभेच्या 10 ते 12 जागा सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या जागा दिल्या जाव्यात असंही यात सांगण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग बातमी -'... तर शरद पवार पंतप्रधान झाले असते', सुशिलकुमारांनी सांगितला भन्नाट किस्सा

महाराष्ट्रातील निवडक जागांची यादी आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने भाजप नेतृत्वाला दिली आहे. त्यात  10 ते 12 जागा सोडण्याची भाजपकडे मागणी केली आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाला 1 विधानपरिषद सदस्यत्व आणि 2 महामंडळाची चेअरमन पदे  देण्यात यावीत अशीही मागणी करण्यात आली आहे. राज्यातील महामंडळाची सदस्यपदे रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी अशी आग्रही मागणी ही या शिष्टमंडळाने केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील काँग्रेसच्या मार्गावर? 'भाजपमध्ये जाऊन चूक केली' बडा नेता थेट बोलला

महायुतीतल्या प्रमुख तीन पक्षात अजूनही जागा वाटपाबाबत एकमत झालेले नाही. कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही निश्चित नाही. जास्तीत जास्त जागा पदरात पडाव्यात अशी तिन्ही पक्षांची रणनिती आहे. त्यात आता घटक पक्षांनीही जागांची मागणी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी ही वीस ते पंचवीस जागा मिळाल्या पाहीजेत अशी मागणी केली आहे. शिवाय सदाभाऊ खोत यांनीही विधानसभेला जागा मिळाव्यात असं म्हटलं आहे. त्यात आता रामदास आठवले यांनी दहा ते बारा जागांची मागणी केली आहे. अशा वेळी या घटक पक्षांना कशा पद्धतीने सामावून घ्यायचे हा प्रश्न भाजप समोर आहे. त्यातून ते कसा मार्ग काढतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.