लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. भाजपाच्या खासदारांची संख्या 23 वरुन 9 वर घसरली. या पराभवाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. भाजपानं निवडणूक लढवलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडं यंदा संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या नवनीत राणा यंदा भाजपाकडून लढल्या होत्या. या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा 19731 मतांनी पराभव केला. या निकालानंतर महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी गंभीर आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय केले आरोप?
'महायुतीत बच्चू कडू नव्हते. अचलपूरची जनता खोके आणि वसुली, ब्लॅकमेलिंगचा हिशोब मागणार आहे. तोडपाणी,वसुली, ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांचा चेहरा जनतेसमोर आला आहे. याचा हिशोब जनता मागणार आहे. बच्चू कडूंचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत काय बार्गेनिंग करण्यात आली, कुठून त्याच्यासाठी वसुली झाली. कोणी त्यांना सप्लाय केला, कुठून त्यांच्याकडे पैसे आले याचा हिशोब माझ्याकडे आहे. बच्चू कडूंचे तोडपाणी, ब्लॅकमेलिंग, वसुलीत त्यांचे एक नंबरचे काम आहे. जो चेहरा तुम्हाला दिसतो तो दाखवण्यासाठीचा आहे. त्यांचा खरा चेहरा वेगळा आहे.
( नक्की वाचा : 'गरज सरो, वैद्य मरो!' प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंवर का भडकले? )
नवनीत राणांना पाडण्यासाठी तुम्ही उमेदवार उभा केला, तुम्ही विकासाचा विचार करून उमेदवार उभा केला नाही. नवनीत राणा खासदार झाल्या असत्या तर त्या केंद्रात मंत्री झाल्या असत्या. जनता ठरवेल तेव्हा रवी राणा पडेल, कोणाच्या सांगण्यावरून तो पडणार नाही. राजकीय पोळी शेकल्याने नवनीत राणा यांचा पराभव झाला. मी कोणावरही खापर फोडत नाही, पराभवाची जबाबदारी मी स्वत: घेत आहे. राजकीय खेळ्या करण्यात आल्या त्याबद्दल मी माझे मत मांडलेले आहे. आज जी दिशाभूल झाली त्याचे उत्तर विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना मिळेल,' असा इशारा राणा यांनी दिला.
बडनेरा विधानसभा मतदारसंघातून मी युवा स्वाभिमान पक्षाकडूनच निवडणूक लढवणार आहे. सोबत राहून आम्ही बेईमानी करत नाही. घटक पक्षांसोबत आमची बैठक होईल तेव्हा ज्या पक्षाची जिथे ताकद आहे तिथे त्या पक्षाचा उमेदवार दिला जाई, असं राणा यांनी सांगितलं.
राणांच्या पराभवात बच्चू कडूंचा निर्णायक वाटा
अमरावती लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचे दिनेश बूब उभे होते. दिनेश यांनी या निवडणुकीत तब्बल 4 लाख 40 हजार 971 मतं मिळवली. नवनीत राणा यांचा फक्त 19 हजार 731 मतांनी पराभव झाला. बच्चू कडू यांनी उमेदवार उभा केल्यानंच नवनीत राणा यांना खासदार होता आलं नाही, असं मानलं जातंय. रवी राणा यांनी देखील हा आरोप करत या चर्चांना बळ दिलंय. आता राणांच्या या आरोपांना बच्चू कडू काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.