विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. पण त्यानंतर एक आठवडा उलटूनही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. सरकारच्या शपथविधीच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या. आता 5 डिसेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्री कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे. यावरून विरोधकांनी महायुतीवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. येवढं मोठं बहुमत मिळूनही सत्ता स्थापन केली जाता नाही म्हणजे काही तरी गडबड आहे असं बोललं जात आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी महायुतीला डिवचलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. याबाबत बोलताना रोहित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना चिमटे काढले आहे. आधी 26 तारखेला सर्व पार पडायचं होत. नंतर 29 तारीख झाली. नंतर 2 झाली आणि 5 तारीख शपथविधीसाठी जाहीर करण्यात आली आहे. हे म्हणजे असं झालं की नवरदेवाला नवरी पसंत आहे. लग्न ठरलं आहे. पण लग्नाची तारीख जवळ आली आणि नवरदेव रूसून बसला आहे. त्याचं म्हणण आहे की मला हुंडा पाहिजे. त्यांना आता वेगवेगळी पदं हवी आहेत. अशी सध्याची महायुतीची अवस्था झाली आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - भाजपने आधी ठाकरेंना फसवलं आता एकनाथ शिंदेंची फसवणूक, बड्या नेत्याचा बडा आरोप
शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांनी जाहीर आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला आमदार रोहित पवार,खासदार निलेश लंके, यांच्या पत्नी राणी लंके उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली आहे. लागलेला निकाल हा संशयास्पद असल्याचं ते म्हणाले. याविरोधात आपण आवाज उठवणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने ईव्हीएम मशीन बाबत निवडणूक आयोगाकडे फेर तपासणीची मागणी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनरला सांगितले होते की मॉक करायचे नाही. जिथं मतदान झाले त्यातलचं एक ईव्हीएम घ्यायचं आणि त्याचं प्रात्यक्षिक करायचं. शिवाय व्हीव्हीपॅट तिथं मोजायचे. हे सुप्रीम कोर्टाने आदेश आहेत. पण तिथं इलेक्शन कमिशनने वेगळेच केलं असल्याचं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांची भेट घेऊ असंही ते म्हणाले. त्यांनी नाही ऐकलं तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याच देखील रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.