जाहिरात

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर भगवा दहशतवादाचा शिक्का बसला आणि खासदारकीचा मार्ग प्रशस्त झाला

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर भगवा दहशतवादाचा शिक्का बसला आणि खासदारकीचा मार्ग प्रशस्त झाला
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.
मुंबई:

'संकटात संधी' असा आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे. हा वाक्प्रचार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना चपखल लागू होतो. मध्य प्रदेशात प्रज्ञा सिंह यांना साध्वी म्हणून ओळखले जाते. 2008 साली महाराष्ट्रातील मालेगावात स्फोट झाले आणि हे नाव संपूर्ण देशाला कळाले. दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना अटक केल्यानंतर भगवा दहशतवाद असे लेबल या स्फोटप्रकरणाला कायमचे चिकटले. याच भगवा दहशतवाद शब्दामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांचा खासदारकीचा मार्ग प्रशस्त झाला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून  सहजपणे निवडून आल्या. 

29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या स्फोटांमुळे मालेगाव हादरले होते. सुरुवातीला हा स्फोट प्रतिबंधित दहशतवादी संघटना सिमीने घडवला असावा असा संशय एटीएसला येत होता. यापूर्वी महाराष्ट्रात घडविण्यात आलेल्या स्फोटांमध्ये पाकिस्तानचा आणि त्यांनी तयार केलेल्या स्लीपर सेलचा हात सातत्याने आढळून आला होता, त्यामुळे हा स्फोट देखील अशाच कुठल्यातरी दहशतवादी संघटनेने घडवला असावा असा संशय वर्तवण्यात येत होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात या स्फोटाचा तपास करणाऱ्या एटीएसने जेव्हा हा स्फोट उजव्या विचारसरणीच्या संघटनेने घडवला असल्याचे सांगितले तेव्हा संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. आतापर्यंतच्या दहशतवादी कारवायांमध्ये कधीही हिंदुतत्ववादी संघटनांचा हात नव्हता.

( नक्की वाचा : Malegaon Bomb Blast: 'माझ्याच देशाने मला दहशतवादी बनवलं', निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञाला अश्रू अनावर )
 

मालेगावातील स्फोट हा एका मोटारसायकलला स्फोटके बांधून घडविण्यात आला असल्याचे एटीएसला तपासात कळाले होते. ही मोटारसायकल साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचं तपास यंत्रणांनी म्हटले होते. आयुर्वेदीक वैद्याची घरी जन्मलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मोटारसायकल चालवणे आवडायचे.  साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्या संघाच्या महिलांशी निगडीत विविध शाखांसोबत काम करत राहिल्या. एटीएसने या स्फोटांप्रकरणी प्रज्ञा सिंह यांना अटक केली आणि चौकशीअंती तपास यंत्रणांनी दावा केला होता की प्रज्ञा सिंह ठाकूर याच स्फोटाच्या मास्टरमाईंड होत्या. 

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आरोप केला होता की एटीएसने चौकशीदरम्यान त्यांचा अनन्वित छळ केला. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे आणि परमबीर सिंह या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर छळाचे गंभीर आरोप केले होते. कोर्टामध्ये दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात तपास यंत्रणांनी आपला कसा छळ केला हे प्रज्ञा सिंह यांनी सविस्तरपणे मांडले होते. प्रज्ञा सिंह ठाकूर या हेमंत करकरे यांचा कमालीचा द्वेष करत होत्या. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात करकरे शहीद झाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अत्यंत कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली होती. आपल्या शापामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने छळाप्रकरणी चौकशी केली होती मात्र यामध्ये प्रज्ञा सिंह यांनी केलेले आरोप निराधार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. 

प्रज्ञा सिंह यांना अटक झाली त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं, आणि केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA-1) सत्तेत होती. भाजपने आणि इतर भगव्या संघटनांनी तिच्या समर्थनार्थ आंदोलन केलं, आरोप केला की 2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिम मतदारांना संतुष्ट करण्यासाठी "भगवा दहशतवादाचा" मुद्दा तयार करण्यात आला होता. 

( नक्की वाचा : Malegaon Bomb Blast Case : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी )
 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जे धर्मनिरपेक्ष विचारधारेचे पालन करत असल्याचा दावा करतात, निवडणुकीतील यशासाठी अल्पसंख्याक मतांवर अवलंबून आहेत, असा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप होता. प्रज्ञा यांच्याबद्दल हिंदुत्तवादी गटांमध्ये सहानुभूती वाढवणारी गोष्ट म्हणजे तिच्या अटकेदरम्यान तिला कॅन्सरचे निदान झाल्याची बातमी. गोमूत्र आणि पंचगव्य सेवन करून आपण आजारातून बऱ्या झाल्याचा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

तपास यंत्रणेने त्यांना मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार म्हणून चित्रित केले असले तरी, भगव्या संघटनांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस राजवटीत हिंदूंवरील कथित अत्याचारांचे प्रतीक म्हणून तिची प्रसिद्धी केली. या प्रतिमेचा फायदा घेत भाजपने तिला 2019 मध्ये भोपाळ लोकसभा जागेसाठी तिकीट दिले. तिने काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचा 364,822 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. मात्र, भाजपने तिला 2024 मध्ये उमेदवार म्हणून उभे केले नाही, त्याऐवजी आलोक शर्मा यांना निवडले.

विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) न्यायालयाने प्रज्ञा सिंह यांना निर्दोष मुक्त केले आणि खटला फेटाळून लावला. स्फोटके मोटरसायकलवर ठेवली होती किंवा मोटरसायकल त्यांची होती हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. विरोधाभास म्हणजे, कायदेशीर लढाईत सरकारी पक्षाच्या पराभवाने सरकारमधील प्रमुख व्यक्ती समाधानी असल्याचे दिसत होते. सरकारच्या प्रतिसादावरून असे सूचित होते की ते उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देणार नाहीत. तथापि, मालेगाव पीडितांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com