
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे त्यांना काळं फासण्यात आलं. यावेळी त्यांच्या अंगावर काळी शाई टाकण्यात आली. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसल्याची माहिती समोर येत आहे.
प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाले होते. त्यांनी याबाबत नाराजी ही व्यक्त केली होती. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी गायकवाड हे शहरात आल्यानंतर त्यांच्यावर काळे टाकण्यात आले. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते.
दरम्यान आज अक्कलकोट मध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांना हे काळं फासण्यात आलं. काळे फासण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी त्यांचा सत्कार केला. माध्यमांशी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, मी या विषयावर आत्ताच बोलणार नाही. योग्यवेळी प्रत्युत्तर दिल्यानंतर आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडतो.
या हल्ल्यानंतर शरद पवारांनीही गायकवाड यांच्याशी संवाद साधल्याचं समोर येत आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या हल्लाचा निषेध केला आहे शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी बहुजन समाजासाठी कार्य करणारे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भाजपचा हल्लेखोर आणि त्यामागील सूत्रधार याला शोधून गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world