महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षात 31 कोटींची वाढ झालीय. त्यामुळे त्यांना नुकतीच आयकर विभागाची (Income Tax) नोटीस आली आहे. ही नोटीस आल्यानतर शिरसाट एका खोलीत पैशांची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे आणखी खळबळ उडाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत शिरसाट यांना लक्ष्य केलं होतं. या सर्व प्रकरणावर शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ते घरं माझं, बॅग माझी....
संजय शिरसाट यांनी विधीमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना व्हिडिओमध्ये दिसत असलेलं घर आपलं असल्याचं मान्य केलं. शिरसाट म्हणाले की, व्हिडिओमध्ये दिसणारं घर माझं आहे. ती माझ्या घरातील बेडरुम आहे. त्या व्हिडिओमधील कुत्राही माझा आहे. पण, तिथं जी बॅग दिसतीय त्या बॅगेत कपडे आहेत. पैसे असते तर ते ठेवायला माझ्या घरात कपाटं आहेत. मी अशा प्रकारे बॅगेत पैसे का ठेवू? असा प्रश्न विचारत त्यांनी संजय राऊत यांनी केलेला आरोप फेटाळून लावलाय.
(नक्की वाचा: Sanjay Shirsat: 'काही जणांनी माझ्याविरोधात...', Income Tax नोटीशीवर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया )
आमच्याकडे मातोश्री 2 नाही. माझ्या मतदारसंघातील घरामध्ये सर्वांना यायला परवानगी आहे. माझ्याकडे चिठ्ठी देऊन आतमध्ये घेतलं जात नाही. येणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी कुणी व्हिडिओ काढला असेल तर गैर नाही. मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, असा आरोप शिरसाट यांनी केला. मी उत्तर देऊ शकतो म्हणून ते मला बोलतात. व्हिडिओमध्ये दिसणारी बॅग प्रवाशातून आणलेली बॅग आहे. त्यामध्ये पैसे नाहीत, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी यापूर्वी एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यामध्ये एका खोलीस संजय शिरसाट बेडवर बसलेले दिसत आहेत. तसंच त्यांच्यासमोर एक बॅग देखील आडवी आहे. हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाहिला पाहिजे. देशात काय सुरु आहे? महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांचा हा व्हिडिओ खूप काही सांगतो, असा आरोप राऊत यांनी केला होता.