Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ?

पवार काका-पुतण्यांमध्ये नुकतीच बंद दरवाज्याच्या भेट झाली. या भेटीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व कायम राहिल का? हा प्रश्न विचारला जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राज्यात सध्या पुनर्मिलनाचा मोसम सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार का? ही चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील जवळीकतेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. काका-पुतण्यांमध्ये नुकतीच बंद दरवाज्याच्या भेट झाली. या भेटीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व कायम राहिल का? हा प्रश्न विचारला जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का सुरु झाली चर्चा?

पुण्यातील वसंतदादा पाटील शुगर इंस्टीट्यूटमध्ये झालेल्या बैठकीनंतर राज्यात ही चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीत पवार काका-पुतण्यांमध्ये कोणताही दुरावा दिसला नाही. जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी बंडखोरी केली. त्यानंतर पवार काका-पुतणे खूप कमी वेळा एका स्टेजवर बसले होते. एका स्टेजवर बसल्यानंतरही ते दोघं एकमेकांच्या बाजूला बसणे टाळत. पण, यंदा ते फक्त एकमेकांच्या बाजूला बसले नाहीत तर त्यानंतर जे झालं त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अंदाजांचा महापूर आला आहे.

शरद पवार आणि अजित पवार हे दोघंही वसंतदादा पाटिल शुगर इंस्टीट्यूटचे पदाधिकारी आहेत. अधिकृत बैठक झाल्यानंतर काका-पुतणे बंद खोलीत एकमेकांना भेटले. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. ही चर्चा कोणत्या मुद्यावर झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, या भेटीनंतर काका-पुतण्यांमध्ये पुन्हा कोणती खिचडी शिजतीय का ही चर्चा सुरु झालीय. 

( नक्की वाचा : 'सुनेत्रा पवारांना बहिणीविरुद्ध उभं केलं ही चूक', अजित पवारांची मोठी कबुली )
 

शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ आहे. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर दोन्ही पवार एकच आहेत, असं सांगून टाकलं. एकनाथ शिंदे वेगळे झाल्यावर दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना भेटताना किंवा एकत्र चहा पिताना दिसत नाहीत, याची आठवणही त्यांनी करुन दिली. 

Advertisement

संजय राऊतांची धक्कादायक प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी शरद पवारांबाबत दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक आहे. 2019 साली संजय राऊत यांनीच शरद पवारांच्या सोबत महाविकास आघाडीच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. राजकीय वर्तुळात ते पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. अर्थात या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, आम्ही नेहमी भेटतो असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. 

अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडून नवं समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. शरद पवारांची प्रतिमा हे याचं कारण आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा या प्रकारचा निर्णय घेतलाय. त्याचा अंदाज भल्या भल्या राजकीय तज्ज्ञांना करता येत नाही. 'शरद पवारांचं डोकं समजायला 100 जन्म घ्यावे लागतील,' असं स्वत: संजय राऊत यांनीच 2019 साली सांगितलं आहे. 

Advertisement

ठाकरे बंधू एकत्र येण्याचीही चर्चा

राज्यात शरद पवार आणि अजित पवारांप्रमाणेच अन्य दोन नेत्यांच्या युतीची देखील चर्चा आहे. गेल्या आठवड्यात आपण महाराष्ट्राच्या हितासाठी  उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यास तयार असल्याचं राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही आपण तयार असल्याचं सांगितलं. पण, त्यासाठी भाजपापासून दूर अंतर ठेवण्याचं आश्वासन दिलं. दोन्ही भावांची राजकीय स्थिती सध्या कमकुवत आहे. त्यामधून बाहेर पडण्यासाठी ते जुन्या गोष्टी विसरुन एकत्र येण्याचा मार्ग शोधत आहेत. 

अस्तित्वचं धोक्यात असेल तर जुने वाद आणि स्पर्धा या गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत. स्वत:चं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी वाटाघाटी कराव्या लागतात. ऱ्हदयावर दगड ठेवावा लागतो. बरंच काही विसरावं लागतं. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हेच होत आहे. 
 

Advertisement