छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाली आहे. यापूर्वी संदीपान भुमरे संभाजीनगरचे पालकमंत्री होते. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भुमरे यांनी आमदारकी तसंच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त होते. या रिक्त जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपली निवड केल्याची माहिती सत्तार यांनी स्वत: 'NDTV मराठी' ला बोलताना दिली आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, सत्तार यांनी त्यापूर्वीच निवड झाल्याचा दावा केला आहे. सत्तार यांच्या समर्थकांनीही संभाजीनगरमध्ये जल्लोष करत या निवडीचा आनंद साजरा केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडचे आमदार आहेत. भुमरे यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद आपल्याला मिळावं यासाठी ते प्रयत्नशील होते. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी देखील पालकमंत्रीपद आपल्याकडं यावं यासाठी आग्रही असल्याचं वृत्त होतं. पण, अखेर मुख्यमंत्र्यांनी या पदासाठी सत्तार यांची निवड केली आहे.
अब्दुल सत्तार यांनी या निवडीवर बोलताना पालकमंत्रीपदाबाबत भाजपाशी कोणताही मतभेद नसल्याचा दावा केला आहे. संदीपान भुमरे हे यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे हे पद शिवसेनेकडं होते. आमचे पक्षप्रमुख तसंच राज्याचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्या जागेवर माझी निवड केली. त्याबद्दल मी आभारी आहे, असं सत्तार यांनी सांगितलं. प्रशांत बंब आणि हरीभाऊ बागडे या संभाजीनगरमधील भाजपा आमदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
( नक्की वाचा : BJP-RSS मध्ये अजित पवारांवर खलबतं, बंद बैठकीत नेमकं काय झालं? Inside Story )
संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी अब्दुल सत्तार यांच्यासह अतुल सावे देखील प्रयत्नशील होते. महायुतीत संभाजीनगरचं पालकमंत्री पद नेहमी शिवसेनेकडे राहिले आहे. त्यामुळे या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी अब्दुल सत्तार देखील इच्छुक होते. या पदासाठी अब्दुल सत्तारांकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची देखील चर्चा आहे. अब्दुल सत्तार पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे चर्चा सुरू आहे, त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपलं प्रासंगिक करार असल्याचं सत्तार म्हणाले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार शिवसेनेची साथ सोडणार का? असा प्रश्नही विचारला जात होता.