- ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे
- मोदी सरकार महिला आरक्षण आणि मतदार संघ पुनर्रचना विधेयक पुन्हा लोकसभेत आणण्याच्या तयारीत आहे
- उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक मातोश्रीवर बोलावलेली होती
Uddhav Thackeray: सध्या दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. ममता यांना अनेक आमदार खासदार सोडून जात आहेत. यामागे भाजपचाच हात असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सतर्क झाले आहेत. महिला आरक्षण आणि मतदार संघ पुनर्रचना विधेयक पुन्हा लोकसभेत आणण्याची मोदी सरकारची तयारी आहे. त्यामुळे दोन तृतिअंश बहुमत मिळवण्याचे प्रयत्न सरकारने चालवले आहेत. त्यामुळे ठाकरे हे सावध झाले आहेत.
आपले खासदा फुटू नयेत यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची बैठक उद्धव यांनी मातोश्रीवर बोलावली आहे. या बैठकीला किती खासदार उपस्थित राहातात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत 9 खासदार आहेत. तर राज्यसभेत संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिनिधीत्व करत आहे. लोकसभेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार मातोश्रीवर बैठकीसाठी पोहोचले होते. दोन खासदार हे नॉटरिचेबल होते. तर ओमराजे निंबाळकर हे मुलगा आजारी असल्याने बैठकीला आले नाहीत.
मातोश्रीवर झालेल्या बैठकी अरविंद सावंत, राजाभाऊ वाझे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील हे उपस्थित होते. या शिवाय संजय राऊत यांनी ही या बैठकीला हजेरी लावली होती. तर परभणीचे खासदार संजय जाधव आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे नॉटरिचेबल होते. त्यामुळे हे दोन खासदार कुणाच्या बाजूने असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाऊसाहेर वाकचौरे हे अनुपस्थित असले तरी त्यांच्या मुलींनी खाजगी कामासाठी बाहेर असल्याचं सांगितलं. शिवाय ऑपरेशन टायगरचे ते भाग नाहीत असं ही स्पष्ट केलं होतं.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाच्या एका जेष्ठ नेत्याने पुढील चार पाच दिवसात ठाकरेंचे सहा सात खासदार फुटतील अशी भविष्यवाणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. पण ते फत्ते कधी होणार याचीच प्रतिक्षा आहे. त्यात आता टीएमसीच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाला ही सुरूंग लावण्याची तयारी शिंदे आणि भाजपने चालवली असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.