शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त विधानसाठी ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड हे विजयी झाले. पण हा विजय त्यांच्या जिव्हारी लागला आहे. कारण ते अगदी काठावर निवडून आले आहेत. त्यांनी निसटत्या विजयाची नोंद केली. अवघ्या 800 मतांनी ते विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी गायकवाड यांना घाम फोडला होता. ते विजयी झाले पण त्यांच्या मनातून मतदारांबाबत असलेला राग मात्र काही गेला नाही. त्यांनी सत्कार कार्यक्रमात मतदारांनाच खरी खोटी सुनावली. यावेळी बोलताना त्यांची नेहमी प्रमाणे जीभ घसरली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाण्यातील जयपूर येथे सत्कार कार्यक्रमात आयोजीत करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार गायकवाड यांनी मतदारांनाच झापले. आपल्याला मतदान कमी मिळाले त्याबाबत त्यांना पहिले नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांची गाडी सुसाट सुटली. त्यांनी मतदारांनाच फैलावर घेतले. तुम्हाला फक्त दारू, मटण,पाचशे रुपये पाहिजेत. तुम्ही लोक फक्त दोन दोन हजारात विकले गेले असा आरोपही त्यांनी थेट मतदारांवर केला.
ते ऐवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी मतदारना भाडखाऊ साले असे ही म्हटले. तुमच्या पेक्षा शरीर विक्री करणाऱ्या बऱ्या असं म्हणण्याची मजल ही त्यांची गेली. त्यांनी थेट मतदारांनाच लक्ष्य केल्याने मतदारही यावेळी आवाक झाले. त्यांना गायकवाड काय बोलत आहेत हेच समजत नव्हते. त्यांचे बोलणे ऐकून घेण्या शिवाय काही पर्याय ही नव्हता. मात्र त्यांच्या बोलण्याची चर्चा त्यांच्या मतदार संघात होती. ते नेहमीच वादग्रस्त विधाने करत असतात. मात्र त्यात ते विरोधकांवर टीका करतात.
यावेळी मात्र त्यांनी ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्याच मतदारांवर त्यांनी आगपाखड केली. मतदारांना शिवराळ भाषेत त्यांनी सुनावले. निसटत्या विजयाचा रागच जणू त्यांनी काढला आहे. जरी ते विजयी झाले असले तरी नाममात्र 800 मतांनी जिंकणे हे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. आपला पराभव व्हावा यासाठी पक्षातील नेत्यांची षडयंत्र रचले होते असा आरोप त्यांनी या आधीही केला होता. त्यानंतर त्यांनी आता मतदारांनाही दोष दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world