विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्के दिले आहेत. ठाकरे गटाचे अनेक मोहरे शिंदेंच्या गळाला लागले आहेत. कोकणातला ही ठाकरे गटाचा एक बडा नेता शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. ही चर्चा थांबत नाही तोच आता धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडतील असं त्यांनी म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
धाराशिव जिल्ह्यात येत्या काही दिवसात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सुचक विधान प्रताप सरनाईक यांनी केले आहे. धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचा एक खासदार आणि दोन आमदार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे ठाकरे गटाचे जिल्ह्यात प्रतिनिधी आहेत. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंसोबत राहणे पसंत केले होते.
यांच्या पैकी कोणी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का याची आता चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पहिल्या जिल्हानियोजन समितीच्या बैठकीतील त्यांनी आपल्या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. शिवाय येणाऱ्या काळात जिल्ह्यात राजकीय भूंकप होणार हे स्पष्ट केलं आहे. अशा स्थिती हे ऑपरेशन टायगर नक्की कोणासाठी आहे. हा सापळा कोणासाठी रचला गेला आहे. त्यात कोण अडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान जिल्हा नियोजनच्या या पहिल्या बैठकीत सर्वांचे लक्ष लागले होते ते माजी मंत्री तानाजी सांवत उपस्थित राहाणार की नाही याकडे. पण तानाजी सावंत यांनी या बैठकीकडेही पाठ फिरवली आहे. त्यांना मंत्री न केल्याने ते नाराज आहेत. त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचे यावरून पुन्हा एकदा दिसून आले आहे. याबाबत विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. त्यांच्या नाराजीबाबत आपल्याला काही माहित नाही असंही ते म्हणाले.