भाग्यश्री प्रधान आचार्य
ठाकरे गटाला गेल्या काही दिवसात धक्क बसले होते. रत्नागिरीत माजी जिल्हापरिषद अध्यक्षाने राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला. तर दुसरीकडे पालघरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहीक राजीनामे दिले. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडालाच सुरूंग लावला आहे. डोंबिवलीतील शिंदेंचे विश्वासू आणि ताकद असलेले नेते म्हणून ओळख असलेले दीपेश म्हात्रे यांनी ओळख आहे. त्यांनी आता शिंदेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयाने भाजपचे मात्र टेन्शन वाढले आहे. डोंबिवलीत सध्या भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण आहेत. ते मंत्रीही आहेत. दीपेश हेच आता ठाकरे गटातून चव्हाण यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
ठाकरेंबरोबर चांगले संबंध
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दीपेश म्हात्रे यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ज्यावेळी दीपेश मात्रे शिंदे गटात गेले त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीला भेटून आले आणि मगच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडलं आहे. शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. दीपेश म्हात्रे यांनी धनुष्यबाण सोडून ठाकरेंची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दीपेश म्हात्रे आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेमधील चार माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यां घेवून ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. हा पक्ष प्रवेश मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे, अशी माहिती दीपेश यांनी दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 9 महिन्याचा चिमुकला, गळ्याला साप चावला, 20 दिवस बेशुद्ध, नंतर जे झालं ते...
शिंदे गट की ठाकरे गट
अखंड शिवसेनेत फूट पडल्यानंतर दीपेश म्हात्रे काही दिवस राजकारणात शांत असल्याचे पाहिला मिळाले होते. इतकेच नव्हे तर नेमके शिंदे गटात जावे की ठाकरे गटात जावे हे देखील त्यांना ठरवता येत नव्हते. मात्र एका वरिष्ठ नगरसेवकाने दिलेल्या सल्ल्यानुसार सध्या सत्तेत असलेल्या शिंदेंना पाठिंबा दिला तर राजकीय ताकद मिळेल असे सांगितले होते. त्यानुसार दीपेश म्हात्रे यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर मात्र दीपेश म्हात्रे श्रीकांत शिंदेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. कल्याण डोंबिवलीवर एकनाथ शिंदे यांची चांगली पकड आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील अनेक बडे नेते हे शिंदें बरोबरच राहीले. दीपेश म्हात्रे यांनी ही शिंदेंनाच साथ दिली. शिवसेनेचा कल्याण डोंबिवलीतील युवा चेहरा म्हणून दीपेश यांच्याकडे पाहीले जाते. त्यामुळे त्यांच्यावर युवा सेनेच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. युवा सेनेचे काम ही ते करत होते. अनेक युवकांना त्यांनी संघटने बरोबर जोडले होते.
ट्रेंडींग बातमी - निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केल मग नदीत फेकले
मंत्री रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे यांच्यात कुरबुरी
सुरुवातीपासूनच भाजपचे मंत्री आमदार असलेल्या रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे यांच्यात कुरबुरी सुरू होत्या. अनेक वेळेला दीपेश म्हात्रे यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांना उघड उघड विरोध देखील केला आहे. डोंबिवलीतील विकास कामे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामुळे अडकली असल्याचे त्यांनी एका पत्रकार परिषदेत देखील सांगितले होते. इतकेच नव्हे तर रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे भूमिपुत्र नाहीत असे म्हणत भूमिपुत्र व विरुद्ध उपरा अशी देखील लढाई सुरू झाली होती. डोंबिवली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास दीपेश हे इच्छुक होते. मात्र ही जागा भाजपची आहे. इथे रविंद्र चव्हाण हे आमदार आहेत. शिवाय राज्यमंत्रिमंडळात मंत्रीही आहेत. त्यामुळे दीपेश यांना संधी मिळणे कठीण होते. त्यात रविंद्र चव्हाण यांना स्थानिक पातळीवरून विरोध होत असल्याची चर्चा आहे. काहींनी तर उमदेवार बदलावा अशी ही मागणी केली आहे. त्यात दीपेश यांना अज्ञाताकडून धमक्या येत होत्या. शिवाय महायुतीतलं वातावरणही डोंबिवलीत चांगलं नाही.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE : शिवस्मारकावरून संभाजी राजे आक्रमक, शिवस्मारक शोधण्याचे आंदोलन छेडले
आमदारकीचे तिकिटाची इच्छा...
अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, माजी सभापती अशी पदे भूषवल्यानंतर दीपेश म्हात्रे यांना आमदारकीचे वेध लागलेले पाहिला मिळाले होते. इतकेच नव्हे तर कायमच आमदार रवींद्र चव्हाण यांना दीपेश म्हात्रे यांचा विरोध असल्याने हे तिकीट डोंबिवली विधानसभा क्षेत्राची जागा शिवसेनेने मागून घ्यावी आणि मला आमदारकीसाठी तिकीट द्यावे यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र हे तिकीट भाजपालाच मिळणार असून आमदार रवींद्र चव्हाणच पुढचे उमेदवार असतील हे समजल्यानंतर दीपेश म्हात्रे यांनी आपला मोर्चा ठाकरे गटात वळवलेला पाहिला मिळाला. आता दीपेश म्हात्रे यांना ठाकरे गटातून तिकीट मिळणार का आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोर ते लढणार का हे बघणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
दीपेश म्हात्रे यांना या नगरसेवकांचा पाठिंबा...
रत्ना म्हात्रे, जयेश म्हात्रे , संपत्ती शेलार हे नगरसेवक देखील त्यांच्याबरोबर ठाकरे गटात आज प्रवेश करतील. यामध्ये रत्ना म्हात्रे या दीपेश म्हात्रे यांच्या आई आहेत. तर जयेश मात्रे हे दीपेश म्हात्रे यांचे सख्खे बंधू आहेत. यासर्व गोष्टींचा विचार करता दीपेश यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गट दीपेश यांना डोंबिवलीतून उमेदवारी देवू शकते. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्या समोर मोठे आव्हन उभे राहू शकते. अशा वेळी भाजपचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. दीपेश म्हात्रे हे शिंदेचा हुकमी एक्का म्हणून ओळखले जात होते. त्यांची मतदार संघात चांगली ताकद आहे. शिवाय रविंद्र चव्हाण यांच्या विषयी असलेली नाराजीही त्यांच्या पथ्थ्यावर पडण्याची चर्चा आहे. त्यामुळे दीपेश यांनी योग्य संधीची वाट पाहात निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.