Solapur Shivsena News: शिवसेना शिंदे गटात रोज काही ना काही घटना होताना दिसत आहे. पक्षाचे मंत्री वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आहेत. एका मंत्र्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव ही वाढत आहेत. दुसरीकडे पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचंही बोललं जात आहेत. निधी वाटपातही शिवसेना शिंदे (Solapur Shinde Shivsena News) गटाची कोंडी होताना दिसत आहे. मंत्र्यांच्या अधिकारावरूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षाच्या राज्यमंत्र्याची बाजू घेतल्याचं समोर आलं. त्यात आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गतवाद समोर आला आहे.
सोलापूर शिंदेंच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाचा राजीनामा
शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून शिवाजी सावंत हे काम पाहात होते. त्यांच्याकडे जिल्ह्याची धुरा देण्यात आली होती. शिवाजी सावंत हे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधु आहेत. शिवाजी सावंत हे गेल्या काही दिवसापासून पक्षावर नाराज आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख हे आपल्याला विश्वासात घेत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. शिवाय जिल्ह्यातील नियुक्त्या करताना त्याची आपल्या कल्पनाही दिली जात नाही असं ही त्यांचं म्हणणं होतं.
(नक्की वाचा: Malegaon Bomb Blast : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी)
सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद
नेमणुका करताना जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला विश्वासात घेणं गरजेचं होतं असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे या सर्व गोष्टींना कंटाळून शिवाजी सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी राजीनामा देणं हा शिवसेना शिंदे गटासाठी (Solapur Shinde Shivsena News) मोठा धक्का मानला जात आहे. या सर्व नियुक्त्यांना सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीची किनार असल्याचं ही बोललं जात आहे.
सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार?
तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यांच्या नाराजीचा फटका थेट शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात बसण्याची दाट शक्यता आहे. त्यात काही दिवसापूर्वी शिवाजी सावंत यांच्या कार्यक्रमाला ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. त्यावेळपासून सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच बरोबर तानाजी सावंत यांनाही मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे तेही पक्षापासून दुरावले गेले आहेत. या सर्वाचा परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे.