विशाल पुजारी, प्रतिनिधी
Mla Rajesh Kshirsagar Video Viral : कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एका कंत्राटदाराकडे खंडणी मागत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.कोल्हापुरात ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी नवा व्हिडीओ बॉम्ब टाकल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राजेश क्षीरसागर यांचं स्टिंग ऑपरेशन केल्याचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. कंत्राटदार आणि आमदार क्षीरसागर यांच्या टक्केवारीबाबत संवाद झाल्याचीही माहिती आहे.
रविकिरण इंगवले यांचा क्षीरसागर यांच्यावर जोरदार हल्लाबोल
राजेश क्षीरसागर यांचा एका प्रकरणातील कथित व्हिडिओ रविकिरण इंगवले यांनी जोरदार व्हायरल केलायं.त्यांनी माध्यमांशी बोलताना क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. व्हिडीओत क्षीरसागर कंत्राटदाराकडे खंडणी मागत असल्याचा आरोप इंगवले यांनी केला आहे.दरम्यान या प्रकरणाची विशेष पोलीस महानिरीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार करणार असल्याचंही रविकिरण इंगवले यांनी स्पष्ट केलं आहे.त्यामुळे राजेश क्षीरसागर यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि आमदारकी रद्द करावी, अशी मागणी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलीय. तसच राजेश क्षीरसागर यांचा आणखी एक व्हिडीओ लवकरच बाहेर येणार असल्याचंही इंगवले यांनी म्हटलं आहे.
आमदार राजेश क्षीरसागर काय म्हणाले?
"कोणत्याही फडतूस माणसाने व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला तर त्याला मी किंमत देत नाही.स्वतःचं पक्षातील पद जातं म्हणून वरिष्ठांना खुश करण्यासाठी कोणावर काहीही आरोप करायचं आणि खुश करण्याचं काम सुरू. मी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार.काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा व्हिडिओ प्रसारित केलेला. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार देखील केलेली त्याचं पुढे काय झालं हे त्यांनी का तपासलं नाही.हा सगळा राजकारणाचा भाग आहे.. राजकारणामध्ये सभ्यता नावाचा एक शब्द असतो तो पाळून आम्ही पुढे जातो मी माझी भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करेन.माझ्या विरोधात अनेक व्हिडिओ हे लोक प्रसारित करतात पण लोकांनी मला निवडून दिला आहे त्यांचा विश्वास माझ्यावर किती आहे यातून दिसतं. लोकांनी मला सत्ता दिली. माझी सगळी भूमिका पत्रकार परिषदेमधून स्पष्ट होईल",अशी प्रतिक्रिया राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world