मनीष रक्षमवार
शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. इथं तर नेत्यांनी एकमेकाला हाणल्याचं समोर आलं आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर ते चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. मंत्र्यांनी पाठ फिरवताच इकडे शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये जोरदार राडा झाला. हा सर्व प्रकार गडचिरोलीच्या सर्कीट हाऊसमध्ये झाला.
हा वाद श्रेय वादावरून झाल्याचं बोललं जात आहे. शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून संदीप ठाकूर हे काम पाहात आहेत. तर अहेरी जिल्हाप्रमुख म्हणून राकेश बेलसरे सध्या कार्यरत आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यामुळे जिल्हाभरातील बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते. मात्र मंत्री भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन जिल्हाप्रमुखांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात हमरीतुमरी झाली. एकमेकांना मारहाण झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात दोन वेगवेगळे गट कार्यरत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. आरमोरी गडचिरोली विधानसभेचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर हे जिल्हा महिला प्रमुख अर्चना गोंधळे यांच्यासोबत वर्षा मोरे यांच्याकडे गेले. वर्षा मोरे या जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख आहेत. ज्यावेळी एक गट चर्चा करण्यासाठी जात होता त्याच वेळी दुसरे जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे तिथेच होते. त्यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसैनिक आपसातच भिडले.