शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कोकणातील बडे नेते राजन साळवी (Rajan Salvi ) यांनी आज (बुधवार, 13 फेब्रुवारी) शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. साळवी हे राजापूरचे माजी आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ते नाराज होते. साळवी यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवधनुष्य हाती घेतलं. उद्योगमंत्री उदय सामंत देखील यावेळी उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेली 38 वर्ष शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादानं शिवसेनेचं काम केलं. नगरसेवक, नगराध्यक्ष आणि तीन वेळा आमदार होतो. हा पक्ष सोडून यावं लागतंय त्यामुळे दु:खाश्रू आहेत. त्याचवेळी आनंदआश्रू आहे. कुटुंबातील सदस्य म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. 2009 ते 2019 या काळात लहान भाऊ म्हणून मार्गदर्शन केलं. अडीच वर्षांपूर्वी भाईसोबत जाऊ शकलो नाही, पण आता पक्ष प्रवेश करत आहे, असं साळवी यांनी यावेळी सांगितलं.
राज्यात 2014 साली परिवर्तन झालं. त्यावेळी मंत्री होईल असं वाटलं होतं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे शिफारस केली होती. पण, ऐनवेळी विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांची शिफारस केली. विनायक राऊत यांच्यामुळे माझं मंत्रिपद हुकलं असा आरोप साळवी यांनी केला. 2019 मध्येही वाटलं होतं संधी मिळेल पण उदय सामंत शिवसेनेत आले आणि मंत्री झाले. 2024 मधील पराभव मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जिव्हारी लागला. आम्ही विनायक राऊत यांना मोठं केलं. त्यांना खासदार केलं पण, तेच राऊत पराभवाला जबाबदार आहेत असा आरोप केला.
( नक्की वाचा : Eknath Shinde : 'शरद पवारांनी मला कधी गुगली टाकला नाही', दिल्लीतील कार्यक्रमात शिंदेंचा सिक्सर )
ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेत आला!
ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेत सामील झाला, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. राजन साळवी यांना पक्षात घ्या. त्यांना 2024 मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी द्या, अशी मागणी उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आमच्याकडं केली. किरण सामंत यांना आमदार होण्याची संधी होती पण तरीही ते राजन साळवी यांना आमदार होण्यासाठी आग्रही होते, असं शिंदे यांनी सांगितलं.
बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजत असे. त्यानंतर सहकाऱ्यांना नोकर, घरगडी अशी वागणूक देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षांपूर्वी राज्यात उठाव करावा लागला. संघर्ष करावा लागला, लोकांच्या मनातील सरकार स्थापन करावं लागलं.
तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहात, याचा आनंद आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले. या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल... ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागेल तिथं कसा राहिल राजन साळवी? असा टोला त्यांनी लगावाला.
एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्या पुरस्कारावरुन राजकारण तापलं आहे. शिंदे यांनी यावेळी बोलताना त्यांनी या विषयावरही जाहीर प्रतिक्रिया दिली.
महादजी शिंदेंच्या विचारांचा अपमान
तुमचा किती जळफळाट होणार, किती शिव्याशाप देणार... माझी लाईन कमी करण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा. घरी बसणाऱ्यांना लोकं स्विकारत नाहीत हे विधानसभा निवडणुकीनं दाखवून दिलं आहे. हा एकनाथ शिंदे जिथं उभं राहतो तिथं लाईन सुरु होते. ही लाईन लोकसेवेची आहे.
एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेल्या लोकांनी महादजी शिंदे यांचा अपमान केला. त्यांच्या इतिहासाचा अपमान केला. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी त्यांची सत्ता आणली , मुख्यमंत्री बनवलं त्यांचाही अपमान केला, असा आरोप शिंदे यांनी केला.
आजपासून तुम्हाला (राजन साळवी) आमच्याप्रमाणे नावं आणि पदव्या देण्यास सुरुवात होईल. आपण त्यांना कामातून उत्तर देऊ. शोलेमधला डायलॉग होता असरानी म्हणत असे आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, मागे बघितलं तर कुणीच नाही. तशी ही अवस्था आहे. आजही तुम्ही जितक्या शिव्या शाप देतायत त्या आरोपांना आम्ही कामातून उत्तर देणार, असं शिंदे यावेळी म्हणाले.
मी मुख्यमंत्री होतो तेव्हापासून माझ्या मनात होते राजन साळवी आले पाहिजेत. त्यावेळी योग नव्हता. काही लोकं त्यांना आडवे आले होते. आता त्यांनी त्यांना दूर केलं आहे. सर्व स्पीडब्रेकर दूर केले आहेत. काम करण्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. फेसबुक लाईव्हनं काम होत नाही. मी सर्व मंत्र्यांना लोकांमध्ये जाण्याची सूचना दिली आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.