सोमनाथ सुर्यवंशी यांचा खूनच झाल्या असल्याचा आरोप पुन्हा एकदा त्यांच्या आईने केला आहे. परभणीत आज शरद पवारांनी सुर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पोलिसांवर आरोपांची झोडच उठवली. तर सोमनाथ यांच्या भावाने त्यांना झालेले अटक ते अंत्यसंस्कार पर्यंत काय काय झालं? पोलिसांनी कशी आडकाठी केली याचा पाढाच वाचला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेत सांगितलं तेसर्व चुकीचं होतं असं तो म्हणाला. यावर शरद पवारांनी सरकारपर्यंत तुमचे म्हणणे पोहचवू असे आश्वासन दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवारांनी आज परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संविधानाची विटंबना झाल्यानंतर परभणीत आंदोलन झालं होतं. त्यावेळी काही जमाव हा हिंसक ही झाला होता. त्यावेळी पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशी यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सोमनाथ बरोबर काय काय झालं याचा पाढा त्यांच्या भावाने शरद पवारांपुढे वाटला.
पोलिसांनी सोमनाथला अटक केली. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांचा फोन आला. त्यात आम्हाला सांगितलं गेलं की सोमनाथला हार्ट अटॅक आला आहे. त्याचा मृतदेह घेवून जा. मात्र त्यानंतर मृतदेह छत्रपती संभाजीनगरला न्या, पुण्याला न्या अशा पद्धतीने पोलिसांकडून सांगण्यात येत होते. शिवाय एकदा आयजीं बरोबर बोलून घ्या असंही सांगितलं गेलं. आयजीं बरोबर बोलताना त्यांनी सोमनाथला दारूचं व्यसन होतं का? सिगारेटचं व्यसन होतं का? अशी विचारणा केली. त्यानंतर त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं आम्हाला सांगितलं. त्याच काळात शवविच्छेदनाचा रिपोर्ट व्हायरल झाला होता.
आम्हाला भावाचा मृतदेह परभणीला नेण्यापासून रोखण्यात आलं. जिथं त्याचा मृत्यू झाला तिथेच आम्ही अंत्यसंस्कार करणार असं कुटुंबीयांनी सांगितलं. त्यावेळ रुग्णावाहीकेच्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी पळवून लावले. आम्ही परभणीला येण्यावर ठाम होतो. त्याच वेळी तिथे एक आयपीएस अधिकारी आले. ते आईला म्हणाले परभणीला बरेच लोक जमले आहेत. तिथे राडा झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? त्यावर आईने संगितलं, माझ्या मुलाला अटक केल्यानंतर तुम्ही कसलीही माहिती दिली नाही? माझ्या मुलाला ठार मारलं गेलं, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर ते अधिकारी काहीच बोलले नाहीत. त्यानंतर आम्ही परभणीत आलो असंही त्यांनी पवारांना सांगितलं.
त्यानंतर सोमनाथ यांच्या आईने आपला म्हणणं शरद पवारां समोर मांडलं. माझ्या मुलाचा मर्डर केला गेलाय. चार दिवस त्याला कोठडीत ठेवलं. तिथं त्याला मारहाण झाली. पोलिसांनी आपल्याला काही कळवलं नाही. आम्हाला बोलावलं असतं तर आम्ही त्याला समजवून सांगितलं असतं. पण पोलिसांनी त्याला मारहाण करून त्याचा जीव घेतला. माझ्या मुलाचा जीव गेला त्यावेळी जे जे पोलिस ड्युटीवर होते त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.पोलिसांनी सोमनाथचा मोबाईल जप्त केला आहे. ते सर्व डाटा डिलिट करतील अशी भिती त्यांच्या भावाने व्यक्त केली.दरम्यान सोमनाथ हिंसक आंदोलन करत होता, त्याचे व्हिडीओ सार्वजनिक करा असी मागणी ही कुटुंबीयांनी केली आहे. शिवाय पोलिस स्टेशन मधील व्हिडीओ ही सार्वजनिक करावे अशी मागणी केलीय. सोमनाथची परिक्षा होती. त्यामुळे तो सोडण्याची विनंती करत होता पण तसं झालं नाही असे ही त्यांनी सांगितलं.
दरम्यान शरद पवारांनी सुर्यवंशी कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले. जी घटना घडली ती धक्कादायक असल्याचं ते म्हणाले. जनतेमध्ये रोष होता. त्याची प्रतिक्रीया उमटली. त्यातून निदर्शनं झाली. त्यांच्यावर सक्ती करणं चुकीचं होतं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणं योग्य नव्हतं. त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं. सरकार आता उत्तर देत आहे. पण ते न पटणारं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुर्यवंशी कुटुंबाला भेटणं गरजेचं आहे. त्यांची बाजू ऐकणं गरजेचं आहे. तुमच्यावर अन्याय होणार नाही. तुम्हाला न्याय नक्की मिळेल याची काळजी आम्ही घेवू असे शरद पवारांनी यावेळी आश्वासन दिले. तुमच्या घरातला कर्ता मुलगा गेला आहे. ते दुख:पचवण्याची ताकद तुम्हाला मिळो असेही पवार म्हणाले.