विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहाचे कामकाज लवकर आटोपले. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने. विधानभवनाच्या परिसरात हे दोन्ही नेते अचानक एकमेकां समोर आले. त्यानंतर यादोघांनीही एकाच लिफ्टमधून जाणे पसंत केले. यावेळी काय चर्चा झाली हे उद्धव ठाकरे यांनी आपल्याच शब्दात सांगितले. दरम्यान या भेटीनंतर भाजप- शिवसेना पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरहे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे ते सभागृहात जाण्यासाठी निघाले होते. तर विधानसभेचे कामकाज आटपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानपरिषदेत चालले होते. एकाच वेळी हे दोन्ही नेते निघाल्याने त्यांचा आमना-सामना झाला. दोघेही विधानभवनाच्या लिफ्ट बाहेर भेटले. त्यावेळी दोघांमध्ये गुफ्तगू ही झाली. याच लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेच्या मजल्या पर्यंत गेले. त्यावेळी त्यांच्या बरोबर प्रविण दरेकर, प्रसाद लाड, अनिल परबही होते.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमदेवार कोण? शेलारांनी थेट नाव घेतलं
ही भेट म्हणजे योगायोगाने झालेली भेट होती असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. लिफ्ट बाहेर झालेली ही अनौपचारीक भेट होती असेही त्यांनी सांगितले. नाना करते प्यार... अशा पद्धतीचे ही भेट होती. पुढे बोलताना त्यांना याच्याशी नानांचा काही संबध नाही. म्हणजे नाना पटोले असे त्यांना सांगायचे होते. मात्र या भेटीचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले. याभेटीत कोणतीही चर्चा झाली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र लिफ्टला कान नसतात. भिंतींना कान असतात. त्यामुळे यापुढच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू असे चेष्ठेने या भेटीवर उद्धव ठाकरे म्हणाले.
या भेटीचे पडसादही विधानभवनात उमटले. शिवसेना आमदार अनिल परब यांनी हा योगायोग असल्याचे सांगितले. यातून राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही असेही ते म्हणाले. भविष्यात काय होणार हे माहित नाही असे सांगत त्यांनी गुगलीही टाकली. तर लिफ्टमध्ये चर्चा होतात का? असा प्रश्न भूजबळ यांनी केला. लिफ्टमध्ये जास्त लोक झाले होते. त्याव ठाकरेंनी दरेकरांना खाली उतरवा असे सांगितले. त्यानंतर दरेकर बाहेर आले. हा एक मस्करीचा भाग होता असे दरेकर म्हणाले. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो असे सुचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे याभेटीचा वेगवेगळा अर्थ राजकीय वर्तूळात काढला जात आहे. याचीच चर्चा आज दिवसभर विधानभवनात रंगली होती.