एकीकडे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरून वाद निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी मागणी केली आहे. त्यावरून मविआत वेगवेगळी मते उमटली. असे असताना महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार याचे उत्तर भाजपनेते आशिष शेलार यांनी दिले आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीन नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. अशा वेळी कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार हा प्रश्न महायुतीच्या नेत्यांपुढे आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर हा प्रश्न जास्तच चर्चीला जात आहे. त्याला आता आशिष शेलार यांनी पुर्ण विराम दिला आहे. त्यांनी थेट कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार हेच जाहीर करून टाकले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
महायुतीचे नेतृत्व सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत. विधानसभा निवडणुका काही महिन्यावर आहेत. अशा वेळी महायुतीचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचीही ओरड झाली. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा चांगला राहीला. त्यामुळे सध्या शिंदे हे फ्रंटफूटवर आहेत. त्यात आता भाजपचे नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणूका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार महायुतीचा कोण असणार हे स्पष्ट आहे. या आधीच देवेंद्र फडणवीस यांनीच आगामी विधानसभा निवडणुका या शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील असे वक्तव्य केले होते असेही शेलार यावेळी म्हणाले.
भाजप -राष्ट्रवादीतही रस्सीखेच?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा लपून राहीलेली नाही. जर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जरी निवडणूका लढण्याचे ठरले असले, तरी ऐन वेळी भाजप धक्कातंत्र वापरू शकतो अशी चर्चा आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने हेच धक्कातंत्र वापरले होते. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून अधिक आमदार निवडून आणण्याचा महायुतीच्या तीनही नेत्यांचा प्रयत्न आहे. महायुतीत आल्यानंतर अजित पवारांनी आपली इच्छा बोलून दाखवली होती. त्यावर फडणवीसांनीही एक दिवस अजित पवारांना आम्ही पाच वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू असे वक्तव्य केले होते.
ट्रेंडिंग बातमी - 8 आमदारांचे राजीनामे मंजूर, विधानसभेत अध्यक्षांनी केली घोषणा, 'ते'आमदार कोण?
मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याची तयारी महायुतीने केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतल्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास दुणावला आहेत. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. त्यात आता या सरकारचे शेवटचे अधिवेश होत आहे. या अधिवेशनात मविआने सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली असतानाच खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्या पूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करावी अशी मागणीच त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे मविआचे मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आधी सत्तेत येवू नंतर मुख्यमंत्री ठरवू अशी भूमीका काँग्रेस राष्ट्रवादीने घेतली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world