विधान परिषद निवडणुकीनंतर राजकारण सध्या जोरात आहेत. कोणाचे आमदार फुटले? किती फुटले? का फुटले? याची चर्चा सर्वत्र आहे. महाविकास आघाडीची ही मते फुटली आहेत. त्यावरून महायुतीचे नेते सध्या आघाडीच्या नेत्यांना लक्ष करत आहेत. महायुतीतील तिनही पक्षांची मते वाढली आहेत. त्यामुळे जे आमदार फुटले त्यांचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे जे आम्हाला सल्ले देत आहेत त्यांनी सल्ले देणे बंद करावे असा टोला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. शिवाय जे आमदार फुटले त्यांचे काय होणार याबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आत्मचिंतन करण्याची वेळ
महाविकास आघाडीचे आमदार फुटले हे सत्य आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी आमदार का फुटले याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे. असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान फुटलेले आमदार जर महायुतीत आले तर त्यांच्या तिकीटाचा विचार महायुतीचे नेतेमंडळी करतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहेत. असे सांगत असताना ज्या आमदारांनी विधान परिषदेसाठी मदत केली ते भविष्यात महायुतीत दिसतील असे संकेतच त्यांनी दिले आहे. जवळपास सात ते आठ आमदारांची मते या निवडणुकीत फुटल्याचे स्पष्ट आहे.
ट्रेंडिंग बातमी - ...तर 288 उमेदवारांना पाडू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
कुणाची मते फुटली?
या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची चर्चा आहे. पण काँग्रेसचीच मते फुटली असे नाही. तर शिवसेना ठाकरे गटाची ही मते फुटली असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच मिलिंद नार्वेकर यांच्यामागे कोणाची तरी ताकद होती, अदृश्य हात होते. पण नार्वेकर यांचा विजय कसा झाला हे दोन दिवसांत स्पष्ट होईल, असंही सामंत म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - शिंदे -फडणवीसांची कोंडी? '...तर मुंबईत धडकणार', हाकेंनी पण ठणकावले
छोट्या पक्षांना संपवण्याचा डाव
काँग्रेस आणि उबाठा छोट्या पक्षांना कसं संपवत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणचे कपिल पाटील यांची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. तसेच कालही जयंत पाटील यांचा पराभव झाला. असा टोलाही सामंत यांनी लगावला. स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांची मतं फुटली आहेत, त्यांनी फुटलेल्या आमदारांना बदनाम करू नये असा टोला उदय सामंत यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.