विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीची जवळपास 12 मते फोडण्यात यश मिळवले आहे. त्यातली 8 मते ही काँग्रेसची असल्याची बोलले जात आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीत भाजपचे 4, शिवसेना शिंदे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2 उमेदवार सहज विजयी झाले. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पुर्ण करत विजय नोंदवला. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील आणि भाजपचे सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून रहावे लागले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधान परिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीची 23 मते मिळणे गरजेचे होते. महायुतीकडे एकूण 202 मते होती. त्यांच्या एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. सर्व उमेदवार जिंकण्यासाठी 207 मतांची गरज महायुतीला होती. पण प्रत्यक्षात महायुतीला 214 मते मिळाली. यायाच अर्थ महायुतीला महाविकास आघाडीची मते फोडण्यात यश मिळाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पहील्या पसंतीची 25 मते मिळाली. तर पंकजा मुंडे 26,परिणय फुके 26, अमित गोरखे 26 आणि योगेश टिळेकर 26 यांनी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पुर्ण करत विजय नोंदवला. पण सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची मते मिळवू शकले नाहीत. त्याचा दुसऱ्या पसंतीच्या मतांवर विजयी घोषीत करण्यात आले. तर शिवसेनेच्या मिलींद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली. त्यामुळे पहिल्या फेरीत त्यांनाही विजय नोंदवता आला नाही. तर शेकापच्या जयंत पाटलांना केवळ 12 मतेच पहिल्या पसंतीची मिळाली.
या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ नसताना ही त्यांचे दोनही उमेदवार हे पहिल्या पसंतीच्या मतांवर विजयी झाले. तर शिवसेना शिंदे गटाचे ही दोन ही उमेदवार पहिल्या पसंतीची मते मिळवून विजयी झाले. भावना गवळी यांना काठावरची अगदी 23 मते मिळून त्या पहिल्याच फेरीत विजयी झाल्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर हे 22 मतेच पहिल्या पसंतीची मिळवू शकले. भाजपचे चार उमेदवार पहिल्या पसंतीची मते मिळवून विजयी झाले. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीला मिळालेला हा विजय महत्वाचा समजला जात आहे.