गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण केवळ शब्दाचेच बुडबुडे निघताना दिसत आहे. या दोन्ही पक्षातील प्रमुख नेते ना एकमेकांना भेटत आहेत, ना कोणता ठोस प्रस्ताव देत आहेत. फक्त माध्यमांमधून बोलणे सुरू आहे. अशा वेळी ठाकरेंचे विरोधक मात्र याची मजा घेताना दिसत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर त्याचा थेट परिणाम होवू शकतो असं मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यावर टीका करण्याची संधी त्यांचे विरोधक सोडताना दिसत नाही. त्यात राणे कुटुंबीय आघाडीवर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचा चर्चेची मंत्री नितेश राणेंनी तुळजापुरात खिल्ली उडवली आहे. ते एकत्र येणार म्हणल्यावर आम्हाला झोप लागत नाही. एकाकडे वीस आमदार आणि एकाकडे शून्य आमदार ऐवढी त्यांची शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली आहे.
पुढे बोलताना त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. हिंदुत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचा नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. नितेश राणे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या आधी बोलताना त्यांनी दोन्ही बंधु एकत्र येणार असतील तर आनंदच आहे. जर कुटुंब एकत्र येणार असेल तर त्यापासून कुणालाही काही अडचण असू नये असं ही ते बोलले होते. पण आज त्यांची सुर बदलले.
दरम्यान डिनू मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो असं नितेश राणें यांनी म्हटलं आहे. डिनू प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा असल्याचही राणे म्हणाले. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा नितेश राणेंनी केला.