महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वि. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सामना तीव्र होत आहे. तुमच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटला अशी टीका अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील प्रचार सभेत केली होती. उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर दिलंय. तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेचाी फायनल हरला, असा टोला ठाकरे यांनी लगावलाय.
'तुमच्या पुत्रप्रेमामुळे वर्ल्ड कप गमावला. माझं पुत्र प्रेम तसं नाही. अमित शाह यांचं पक्षातील स्थान नक्की काय आहे? भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांना किती अधिकार असतात, हे सर्वांना माहिती आहे. अमित शाह जे बोलतात त्यामध्ये आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या वक्तव्यामध्ये एकवाक्यता ठेवली पाहिजे. तुम्ही सांगता की आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. अमित शाह यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, 'असं ठाकरे म्हणाले.
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या घोटाळ्याची चौकशी करा, संजय राऊत यांची पंतप्रधानांकडं मागणी
अमित शहांनी केला होता आरोप
अमित शहा यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. 'शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपने फोडले नाहीत. उद्धव ठाकरे यांचं पुत्रप्रेम आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले', असे अमित शाह यांनी म्हटले होते. शाह यांच्या या टिकेला उत्तर देताना ठाकरे यांनी वर्ल्ड कप फायनलचा मुद्दा उपस्थित केलाय.
अमित शाहांचं कनेक्शन काय?
अमित शाह यांचे चिरंजीवर जय शाह बीसीसीआय सचिव आहेत. 2023 साली झालेल्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाली होती. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या भारतीय टीमचा फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पराभव केला होता. त्यानंतर मुंबई किंवा कोलकाता शहरातील पारंपारिक क्रिकेट मैदानाता अंतिम सामना न घेता अहमदाबादमध्ये का खेळवण्यात आला? असा प्रश्न काही जणांनी विचारला होता. हा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर वर्ल्ड कप गमावण्याचं खापर फोडलं आहे.