Uddhav Thackeray: 'उद्धवजींच्या स्वभावात राजकारण कमी, कलाकार जास्त'; चक्क फडणवीसांनी केलं भरभरुन कौतुक!

Uddhav Thackeray Farewell : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (यूबीटी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गारानी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं भरभरुन कौतुक केलं.
मुंबई:

Uddhav Thackeray Farewell : महाराष्ट्र विधान परिषदेत आज एका भावूक वातावरणात अनोखा राजकीय सोहळा पाहायला मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (यूबीटी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गारानी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. उद्धव ठाकरे यांच्यासह 8 सदस्यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ मंगळवारी संपला असून, त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने फडणवीस यांनी ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू उलगडला. उद्धवजींच्या स्वभावात राजकारण कमी आणि एका कलाकाराचे मन जास्त दडलेले आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.

कलेचा वारसा आणि निर्णयाची पक्की ओढ

निरोप देताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीच्या छंदाचा विशेष उल्लेख केला. उद्धव ठाकरे हे केवळ राजकारणी नसून ते एक उत्तम फोटोग्राफर आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या विविध छटा आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. वारीचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरमधून घेतलेली जोखीम त्यांच्या कलेप्रती असलेल्या प्रेमाची साक्ष देते, असे फडणवीस म्हणाले. 

Advertisement

एकदा निर्णय घेतला की परिणामांची चिंता न करता त्यावर ठाम राहण्याचा गुण त्यांना बाळासाहेबांकडून वारसाहक्काने मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

( नक्की वाचा : Rupali Chakankar: भोंदू बाबा खरात प्रकरण नडलं; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांचा राजीनामा )
 

2014 ची जवळीक आणि 2019 चा दुरावा

आपल्या भाषणात फडणवीस यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 2014 नंतरची जवळीक आणि 2019 मध्ये निर्माण झालेला राजकीय दुरावा यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. 

ज्यांना माझा हात पकडून चालायचे होते, ते एखादी गोष्ट धरून बसले, अशा शब्दांत त्यांनी युती तुटल्याच्या घटनेवर भाष्य केले. राजकारणात मतभेद असतात, कधी आपण सोबत असतो तर कधी विरोधात, मात्र त्या पलीकडे सहप्रवासी असण्याचे एक वेगळे नाते असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे हे शब्दांचे धनी आहेत आणि त्यांचे मूळ स्वभाव नाते जपण्याचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

'पुन्हा येईन' नाही, तर 'पुन्हा भेटू'

देवेंद्र फडणवीस यांचे 'पुन्हा येईन' हे वाक्य महाराष्ट्रात प्रचंड प्रसिद्ध झाले होते. मात्र, आजच्या निरोप समारंभात त्यांनी वेगळीच घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सभागृहात निवडून यावे अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी ठाकरे यांना 'पुन्हा भेटू' असे म्हटले. सभागृहात त्यांना ऐकणे नेहमीच आनंददायी असते, त्यामुळे त्यांनी पुढील 6 वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा यावे, अशी साद फडणवीस यांनी घातली. 

Topics mentioned in this article