विशाल पाटील, प्रतिनिधी
Rajmata Jijau ST Bus: महाराष्ट्राची ओळख असलेल्या एसटीच्या ताफ्यात आता 'राजमाता जिजाऊ एसटी बस' या नावाने एक नवी आणि अत्यंत आधुनिक सेवा दाखल झाली आहे. 300 अत्याधुनिक बसेसचा हा भव्य लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महिला आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सन्मानाचे प्रतीक म्हणून या बससेवेला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात आले असून, यामुळे आता राज्यातील कानाकोपऱ्यात प्रवास करणे अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
काय आहेत नव्या बसची प्रमुख वैशिष्ट्ये?
राजमाता जिजाऊ एसटी बसची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे याची आसन क्षमता. या बसमध्ये 3x2 अशा प्रकारची आसन रचना करण्यात आली असून एकूण 56 प्रवाशांना बसण्याची सोय आहे. सध्याच्या सर्वसाधारण बसच्या तुलनेत यामध्ये 16 जागा जादा आहेत, ज्यामुळे प्रवाशांना बसमध्ये जागा मिळणे सोपे होईल.
ही बस सेवा प्रामुख्याने दोन शहरांदरम्यान जिथे प्रवाशांची जास्त गर्दी असते, तिथे 'शटल सेवा' म्हणून चालवली जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. या उपक्रमाची सुरुवात नागपूरपासून होणार असून पहिल्या टप्प्यात 50 बसेस तिथे धावणार आहेत.
( Amravati News: महिन्याला मिळायचे फक्त 150 रुपये, आज 15 कोटींची उलाढाल! अमरावतीच्या शेतकऱ्याला 'ऑक्सफर्ड'मधून बोलावणं )
महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
प्रवासात महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून या बसेसमध्ये विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. स्वारगेट सारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रत्येक बसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी 'पॅनिक बटण' देण्यात आले आहे. तसेच बसमध्ये जीपीआरएस सिस्टम आणि प्रवाशांना माहिती देण्यासाठी डिजिटल स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.
बसमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम असल्यामुळे प्रवाशांना प्रत्येक थांब्याची माहिती आगाऊ मिळणार आहे. विशेष म्हणजे या सर्व आधुनिक सुविधा असूनही तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, ही प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.
🗓️ २४ मार्च २०२६ | 📍 विधान भवन
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) March 24, 2026
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला!
राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला नवी गती देणाऱ्या एसटी महामंडळाच्या ३००० अत्याधुनिक बसेसचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. आधुनिक… pic.twitter.com/eDGB9AEwSr
भविष्यातील मेगा भरती आणि नवीन बसेसचे नियोजन
एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी केवळ गाड्याच नाही तर मनुष्यबळही वाढवले जाणार आहे. परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं की, 17700 पदांच्या नोकरभरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून लवकरच ही प्रक्रिया राबवली जाईल. या 3000 बसेस व्यतिरिक्त आगामी काळात 100 मिनी बसेस, 5000 नवीन बसेस आणि 200 व्होल्वो बसेस अशा एकूण 8300 बसेस घेण्याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. यानंतरच्या टप्प्यात येणाऱ्या बसेस या प्रामुख्याने पर्यावरणपूरक असतील, ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल आणि एसटीचा प्रवास अधिक 'ग्रीन' होईल.
दळणवळणाच्या क्षेत्रात नवी क्रांती
राजमाता जिजाऊ एसटी बसमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर कमी होणार आहे. कामासाठी किंवा शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही शटल सेवा अत्यंत महत्त्वाची ठरेल. जुन्या सर्व सवलती आणि योजना या नवीन बसेसमध्येही पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत. आधुनिक रूप, वाढलेली आसन क्षमता आणि चोख डिजिटल सुरक्षा व्यवस्था यामुळे एसटीचा हा नवा प्रवास प्रवाशांच्या आयुष्यात नवी गती घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world