मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? ठाकरे गटाची नवी भूमिका, युती काळाची होईल आठवण!

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरे गटानं नवा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राज्यात यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं याबाबत कोणतीही घोषणा केलेली नसली तरी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सभा, मेळावे, यात्रा, बैठका यामधून सर्व पक्षांची तयारी सुरु आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही मुख्य लढत होणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ठाकरे गटाचा नवा प्रस्ताव

विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्याच्या सर्वाधिक जागा,  त्याचा मुख्यमंत्री..हे सूत्र मान्य नसल्याचे उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच एका सार्वजनिक सभेत म्हटले आहे. यामुळं एकमेकांच्या जागा पाडल्या जातील अशी भितीही त्यांनी व्यक्त केली होती.

महाविकास आघाडीच्या 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. 'मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मी होणार की आणि कुणी होणार? हा प्रश्न होता. आता पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांनी इथे एक नाव जाहीर करावं. माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल. मुख्यमंत्रिपदाबाबत विरोधकांकडून काडी पेटवली जात आहे. आपल्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद लावले जात आहेत. त्यामुळे जे कोणते नाव असेल ते जाहीर करावे,' अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. 

( नक्की वाचा : 'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप )
 

ठाकरेंच्या  मागणीला शरद पवारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी महायुतीची सत्ता उलथवून लावायची आहे असं आवाहन केलं. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आधी निवडणूक जिंकू नंतर मुख्यमंत्री कोण? ते ठरवू अशी जाहीर भूमिका मांडली. राष्ट्रवादी पवार गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मेळाव्यातील मागणीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा, अशी भूमिका ठाकरे गटानं मांडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Advertisement

युती काळात काय झालं होतं?

राज्यात 2019 च्या विधानसभेपूर्वी भाजपा आणि शिवसेना पक्षाचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस तेंव्हा मुख्यमंत्री होते. 19 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीमध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. 

( नक्की वाचा : उद्धव ठाकरेंनी घातलं काँग्रेसचं उपरणं ! बाळासाहेबांचं नाव घेत म्हणाले...)
 

मातोश्रीमध्ये 'बंद दाराच्या आड' झालेल्या त्या बैठकीत अमित शहा यांनी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असेल, असं आश्वासन दिलं होतं, असा दावा उद्धव ठाकरे सातत्यानं करत आहेत. भाजपानं हा दावा आजवर कधीही मान्य केलेला नाही. 

Advertisement

2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहांसोबत 'बंद दाराआड' झालेल्या चर्चेचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती तोडली. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. या आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.