विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढेल याची जोरदार चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे अशीच मागणी केली. त्यावरून मविआमध्ये सध्या वाकयुद्ध रंगले आहे. तर महायुतीमध्येही नक्की कोणाच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जायचे याचे तर्क लढवले जात आहेत.त्यात आता उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. शिवाय महायुतीच्या अपयशाचा धनी कोण आहे? त्याचे नाव आधी जाहीर करावे असे आव्हानही ठाकरे यांनी दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य
उद्धव ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. त्यानंतर त्याचे पडसाद मविआमध्ये उमटले. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र त्यांनी महायुतीची मात्र कोंडी केली. लोकसभेला जे अपयश पदरी पडले त्या अपयशाचा धनी कोण, ते आधी सांगा असा प्रतिप्रश्न महायुतीच्या नेत्यांना केला आहे. त्यांनी हे नाव जाहीर केल्यानंतर मग आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे सांगू असेही त्यांनी स्पष्ट केले.शिवाय महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा योग्य वेळी जाहीर केला जाईल असेही ठाकरे यांनी सांगितले.
सरकारचे निरोपाचे अधिवेशन
हे अधिवेशन सरकारचे निरोपाचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. या सरकारला सर्वच जण बायबाय करत आहेत. त्यामुळे या सरकारकडून काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. घोषणांचा पाऊस पाडला जावू शकतो. त्यामुळे जे अर्थ संकल्प सादर केला जाईल तो गाजर संकल्प असेल अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या सरकारमध्ये थोडी जरी संवेदना असेल तर गेल्या दोन वर्षात केलेल्या घोषणाची किती अंमलबजावणी झाली याची श्वेत पत्रिका काढावी अशी मागणीच त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या दोन वर्षात वाढल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सव्वा सहा हजार आत्महत्या दोन वर्षात झाल्यात. सरासरी रोज नऊ आत्महत्या होत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं.मुख्यमंत्री झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होवू देणार नाही असे शिंदे म्हणाले होते. त्याची आठवण ठाकरेंनी करून दिली. शिवाय ते हेलिकॉप्टरने फिरणारे शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुख त्यांना समजले नसेल असा चिमटाही त्यांनी काढला.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमदेवार कोण? शेलारांनी थेट नाव घेतलं
विधानपरिषदेची निवडणूक लढणार
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोठी बाब सांगितली. विधानसभेच्या रिक्त होत असलेल्या 11 जागांसाठी शिवसेनाही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवेल असे जाहीर केले. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येवू शकतो असा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीसाठी आमची रणनिती तयार आहे. गणितही पक्कं आहे. शिवाय मत कशी सांभाळायची याची काळजी महायुतीने घ्यावी. निवडणुकीनंतर कोण कोणाला गुप्त पद्धतीने पेढे भरवतोय हे समजेल असे वक्तव्य करत महायुतीमध्ये ठाकरेंनी खळबळ उडवून दिली आहे.